ब्रेकिंग न्यूज

तुरुंगातून बाहेर येताच यु ट्युबर संतोष पंडित म्हणाले, ‘मी आता थांबणार नाही…’

Share

पुणे- उच्च आणि तंत्रशिक्षण तथा भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संतोष पंडित यांची अखेर 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका झाली आहे. येरवडा कारागृहाबाहेर पडल्यानंतर संतोष पंडित यांनी आपली भूमिका मांडली.

संतोष पंडित म्हणाले, ” माझ्यावर झालेली ही कारवाई अनपेक्षित आणि धक्कादायक होती. पण माझा देशाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. संविधानाने मला मत मांडण्याचा जो मूलभूत अधिकार दिला आहे, तोच मी वापरत आलो आहे आणि पुढेही वापरत राहीन ” लोकशाहीत नागरिकच सर्वोच्च असतात, त्यामुळे सत्तेत बसलेल्यांना प्रश्न विचारणे हा लोकांचा अधिकार आहे. मी कोणावरही वैयक्तिक पातळीवर द्वेषातून टीका केलेली नाही. सत्ताधारी कोणाचेही असोत, लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचं काम मी थांबवणार नाही, असे पंडित यांनी स्पष्ट केले. मात्र आपल्या वक्तव्यातील अपशब्दांबद्दल त्यांनी क्षमा मागत भाषेमध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.

पुणे महानगरपालिकेचे कामकाज आणि शहरातील नागरी समस्यांवर संतोष पंडित सातत्याने व्हिडिओच्या माध्यमातून भाष्य करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कामकाजावर बोट ठेवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओत मंत्र्यांवर अश्लाघ्य आणि अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केल्याचा आरोप करत भाजपचे माजी नगरसेवक सुनील पांडे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
तसेच याच प्रकरणात सारिका कांबळे यांनी देखील संतोष पंडित यांच्या विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल करून पंडित यांना ताब्यात घेतले होते.

जामीन देताना न्यायालयानं संतोष पंडित यांच्यावर कडक निर्बंध लादले आहेत. खटल्याशी संबंधित पुराव्यांशी कोणतीही छेडछाड करू नये आणि तक्रारदाराशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये, असं स्पष्ट आदेश कोर्टाने दिले आहेत.