ब्रेकिंग न्यूज

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

Share

पुणे- लोकमान्य टिळकांची राष्ट्रनिर्माणाची संकल्पना काय होती आणि ती साकारण्यासाठी त्यांनी किती मोठा त्याग केला हे आजच्या युवकांनी, विशेषतः Gen Z ने विचार करण्याची गरज आहे. असे मत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी व्यक्त केले. लोकमान्य टिळकांच्या मते स्वातंत्र्य म्हणजे मनाला वाटेल ते करण्याचे नाही तर स्वातंत्र्य म्हणजे राष्ट्रहिताची जबाबदारी स्वीकारणे. देशाच्या हिताला प्राधान्य देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.

पुण्यात लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट यांच्या वतीने अजित डोवाल यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते.

अजित डोवाल म्हणाले की, इंग्रजांच्या अत्याचाराच्या काळात जेव्हा अनेक जण आवाज उठवण्यास घाबरत होते, तेव्हा टिळकांनी नेतृत्व स्वीकारले आणि स्वातंत्र्याचा आवाज बुलंद केला. “आज लोकमान्य टिळक असते तर कदाचित ते म्हणाले असते की ‘भारताला सशक्त आणि विकसित बनवणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.’ आज आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळाले आहे, मात्र आता राष्ट्राला सर्वार्थाने सक्षम बनवण्याची जबाबदारी आपली आहे,

यावेळी अमित शाह यांनी भाषण करताना विद्यार्थ्यांना टिळकांच्या मार्गावर जाण्याचा सल्ला दिला. मला लोकमान्य टिळकांचा गीतारहस्य हा ग्रंथ गुजरातीत मिळाला. माझं तरुणांना आवाहन आहे. तुम्ही टिळकांची गीता वाचा. तुमच्या आयुष्यात तुम्ही कधीच चूक करणार नाही. मी गॅरंटी देतो. हा ग्रंथ भगवदगीतेचं व्यावहारिक स्वरूप आहे. सामान्य माणूस भगवतगीता कशी जगू शकतो. त्याचं व्यवहारीक स्वरुप त्यात आहे, असं अमित शाह म्हणाले.