ब्रेकिंग न्यूज

आर पी आय (आठवले) गटाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा ; ‘जनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करा’

Share

पुणे – अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय राष्ट्रीय जातनिहाय जनगणनेनंतरच अचूक लोकसंख्येच्या प्रमाणानुसार घ्यावा, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी (दि. २७) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने पुण्यात मोर्चा काढण्यात आला.

पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. भर पावसातही पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अनुसूचित जातीतील 59 जातींमधील नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.

उपवर्गीकरणामुळे 59 समाजघटकांमध्ये मतभेद किंवा दुरावा निर्माण होऊ नये. त्यासाठी ही प्रक्रिया राष्ट्रीय जातीय जनगणना पूर्ण झाल्यानंतरच राबवावी. जनगणनेतील लोकसंख्येच्या अचूक आकडेवारीच्या आधारेच न्याय्य आणि वस्तुनिष्ठ निर्णय घेता येईल अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या 59 समाज घटकांची अचूक लोकसंख्या माहीत नसताना उपवर्गीकरण केल्यास समाजात रोष निर्माण होण्याची शक्यता असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे म्हणणे आहे. राज्यातील उर्वरित 58 अनुसूचित जातींना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी मिळावी. 2027 च्या जनगणनेनंतर लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आरक्षणाच्या रचनेचा पुनर्विचार करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

मोर्चात उपमहापौर परशुराम वाडेकर, पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष कुणाल न्हावळकर, पुणे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कदम, महिला आघाडी अध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे, प्रदेश उपाध्यक्ष हुलगेश चलवादी, नगरसेविका हिमाली कांबळे यांच्यासह पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता झाली.