पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आणि बोगस नियुक्तीपत्रे देऊन नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराच्या खंडणी विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत.
प्रतीक राजेश धायींजे (वय २६, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी; मूळ रा. अकलूज, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
या बाबतची माहिती अशी की आरोपी प्रतीक धायींजे हा अनेकजणांना नोकरीचे आमिष दाखवून फसवत असल्याची गोपनीय माहिती खंडणी विरोधी पथकाला १२ सप्टेंबर २०२६ रोजी मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पीडितांशी संपर्क साधून सविस्तर चौकशी केली असता, आरोपीने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात नोकरीचे बनावट कॉल लेटर देऊन पाच जणांची १ लाख १४ हजार ११२ रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी भोसरीतील धावडे वस्ती परिसरात असल्याची माहिती मिळताच खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता, यापूर्वी त्याने ‘म्हाडा’मध्ये स्वस्त घर मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेकांची तब्बल २२ लाख ४१ हजार ७६० रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल आहे. आरोपीला पुढील तपासासाठी भोसरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस अंमलदार प्रदीप पोटे, प्रदीप गोडांबे, किरण जाधव आणि किशोर कांबळे यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.
