ब्रेकिंग न्यूज

भरसभेत महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; पुणे जिल्हा परिषदेतील धक्कादायक घटना

Share

पुणे- जिल्हा परिषदेच्या सभागृहात सर्वसाधारण सभा सुरू असताना एका महिलेने चक्क पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार रोजी सोमवारी (दि. २७ ) दुपारी घडला. यामुळे सभागृहात खळबळ उडाली. सुरक्षा रक्षकांनी महिलेच्या हातातील पेट्रोलची बाटली ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

जिल्हा परिषदेच्या २०२६-२७ पुरवणी मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी सभा बोलविण्यात आली होती. अचानक सभागृहामध्ये सर्वसाधारण सभा सुरू असताना संबंधित महिला हातात पेट्रोलची बाटली घेऊन घुसली. तिने आपल्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. अचानकपणे झालेल्या या प्रकारामुळे सर्वजण अवाक झाले. सुरक्षा रक्षकांनी तातडीने धाव घेत महिलेच्या हातातील पेट्रोलची बाटली ताब्यात घेतली. या महिलेला ताब्यात घेऊन तिला हिरकणी कक्षात नेण्यात आले. या महिलेने जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे बोलले जात आहे.

या घटनेनंतर अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सुरक्षा व्यवस्था कडक करण्याबाबत आदेश दिले. सभागृहात सदस्यांशिवाय कोणालाही प्रवेश देऊ नका, अशा सक्त सूचना देण्यात आल्या. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील, आरोग्य व बांधकाम विभागाच्या सभापती दीपाली हुलावळे यांच्यासह काही सदस्यांनी या महिलेला शांत करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.