ब्रेकिंग न्यूज

राज्यातील ‘या’ साखर कारखान्यास मिळाला आठव्यांदा सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार

Share

अवसरी- पारगाव (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास सन २०२४-२५ या गाळप हंगामासाठी नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांच्यातर्फे ‘देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार ८ वेळा मिळवणारा राज्यातील हा एकमेव सहकारी साखर कारखाना आहे.

देशातील २०२४-२५ च्या गाळप हंगामामध्ये साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणा-या कारखान्यांना नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि.यांच्यामार्फत देण्यात येणा-या पुरस्काराची शुक्रवारी घोषणा करण्यात आली अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली. या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण २२ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे.

कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक वर्षात केलेली ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, साखर उतारा, ऊस वाढीच्या योजना, कर्ज परतफेड, व्याज, खर्चात केलेली बचत, कमीत कमी उत्पादन खर्च, केलेली गुंतवणूक, वेळेत अदा केलेला ऊस दर, ऊस उत्पादकांना दिलेली ठेवीची पासबुके, संचित नफा, कारखान्याचे नक्त मुल्य, शिल्लक कर्ज उभारणी मर्यादा, कारखान्याने उभारणी केलेला व उपलब्ध निधी, विनियोगासाठी केलेले नियोजन, शिक्षण क्षेत्रातील योगदान व सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून केलेली कामे या सर्व बाबींचा विचार करून कारखान्यास हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

यापूर्वी कारखान्यास देश पातळीवरील १३ व राज्य पातळीवरील १७ असे एकूण ३० पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.