पुणे- भोंदूबाबाच्या सल्ल्यानुसार अंधश्रद्धेच्या नावाखाली २९ वर्षीय विवाहित महिलेकडून पतीने अत्यंत घृणास्पद कृत्य करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आपल्या पत्नीला पतीने स्वतःच्या खासगी अवयवाची पूजा करण्यास भाग पाडले. या प्रकरणी पतीसह सासरच्या एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार हा प्रकार ११ मे ते ९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत घडला. पती तिला एका भोंदूबाबाकडे घेऊन गेला होता. पतीचा कथित मंगळदोष दूर करण्यासाठी काही विधी करण्याचा सल्ला संबंधित भोंदूबाबाने दिला. या सल्ल्यानुसार अंगारा पाण्यात टाकून ते पिण्यास महिलेला भाग पाडण्यात आले. त्यानंतर हळदी-कुंकू लावून पतीच्या खासगी अवयवाशी संबंधित पूजा करण्यासही तिला जबरदस्ती करण्यात आल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे. या प्रकाराला विरोध केल्यानंतर महिलेला शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आल्याचेही तिने म्हटले आहे.
हा विधी झाल्यानंतर पतीचा मंगळदोष दूर झाल्याची समजूत कुटुंबीयांनी करून घेतली. मात्र, त्यानंतर पतीने महिलेला पुन्हा सासरी नांदवून घेण्यास नकार दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आपल्या कुटुंबीयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली असून केवळ पतीचा कथित मंगळदोष दूर करण्यासाठीच विवाह करण्यात आल्याचा आरोपही महिलेने केला आहे. महिलेच्या तक्रारीवरून चंदननगर पोलिसांनी पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
