ब्रेकिंग न्यूज

आयटी कंपनीत नोकरीचे आमिष दाखवले, लाखो रुपये घेऊन कंपनीला ठोकले टाळे, पुण्यातील प्रकार

Share

पुणे- मोठे पॅकेज देण्याचे आमिष दाखवून कंपनीत नोकरीला लावल्यानंतर कर्मचाऱ्यांकडूनच पैसे घेऊन कंपनीला टाळे ठोकून कंपनीचे संचालक फरार झाले आहेत. हा प्रकार औंधमधील ‘क्रिएटिव्ह वेब सोल्यूशन्स’ या कंपनीमध्ये घडला आहे. या प्रकरणी फुरसुंगी येथे राहणाऱ्या ३९ वर्षीय महिलेने तक्रार दिली असून चतुःशृंगी पोलिसांनी कंपनीच्या संचालकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची माहिती अशी की ‘क्रिएटिव्ह वेब सोल्यूशन्स’ कंपनीने या तरुणांना मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. यासाठी तरुणांकडून सुरक्षा ठेव, सल्लागार शुल्क, प्रशिक्षण शुल्क या नावाखाली प्रत्येकी १ ते ३ लाख रुपये घेतले. त्यानंतर या तरुणांना प्रशिक्षणाच्या नावाखाली कंपनीत रुजू करून घेण्यात आले. प्रशिक्षण कालावधीत मानधन आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोठ्या आयटी कंपनीत नोकरी मिळेल, असे या तरुणांना सांगण्यात आले. मात्र चार महिन्यांनंतर कंपनीचे संचालक या तरुणांना कोणतेही वेतन न देता आणि मोठ्या आयटी कंपनीत नोकरीस न लावता कंपनीला टाळे ठोकून फरार झाले. या प्रकारामुळे सुमारे दीडशे तरुण आयटी अभियंत्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

या प्रकरणी ‘क्रिएटिव्ह वेब सोल्युशन’ या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश वानरखेडे ऊर्फ आशिष रहाटे, व्यवस्थापकीय संचालक तेजश्री खटाळकर, मनुष्यबळ विभागातील प्रसन्न पद्माकर राव आंबेकर, सागर सुरेश शेळार, मानसी मंगेश शेळार आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीकडून १५० पेक्षा जास्त जणांची फसवणूक झाली असून, यामुळे एकूण फसवणुकीचा आकडा १३ ते १४ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा दावा फसवणूक झालेल्या तरुणांनी केला आहे.

या कंपनीच्या विरोधात आतापर्यंत ३६ तरुणांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. कंपनीत सुमारे १५० कर्मचारी कार्यरत होते. इतरही कर्मचारी आता तक्रारीसाठी पुढे येत असून पोलिसांकडून त्यांचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. चतुःशृंगी पोलीस पुढील तपास करत आहेत.