पिंपरी – आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून एका २६ वर्षीय तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.१४) मध्यरात्री अडीचच्या सुमारास जाधववाडी, चिखली येथे घडली.
रवी धनाजी घोगरे (वय २६, रा. जांभुळकर चौक, जाधववाडी, चिखली) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी स्वप्नील कांताराम जाधव (वय ३७) आणि रोशन पिंगळे (वय २८, दोघे रा. मधला पेठ, जाधववाडी, चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
जखमी रवी आणि आरोपींमध्ये पैशांच्या व्यवहारावरून वाद झाला होता. या वादाचे पर्यवसान भांडणात झाले आणि आरोपींनी रवीवर गोळी झाडली.
या प्रकरणी जखमी रवी घोगरे याने दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
