ब्रेकिंग न्यूज

पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांचा रिक्षा प्रवास महागणार, १ सप्टेंबरपासून इतके भाडे द्यावे लागणार

Share

पुणे- पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील रिक्षा प्रवाशांना एक सप्टेंबरपासून वाढीव भाडे मोजावे लागणार आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) रिक्षा भाडेवाढीला मंजुरी दिल्याने १ सप्टेंबरपासून पहिल्या दीड किलोमीटरसाठी किमान ३० रुपये मोजावे लागणार आहेत.

पहिल्या दीड किलोमीटरसाठीचे किमान भाडे २५ रुपयांवरून ३० रुपये करण्यात आले असून, त्यानंतर प्रति किलोमीटरचा दर १७ रुपयांवरून २० रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खर्चात वाढ होणार असली, तरी वाढत्या खर्चामुळे अडचणीत असलेल्या रिक्षाचालकांना या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक वाहतुकीमध्ये रिक्षा सेवेचा मोठा वाटा असून, जिल्ह्यात सुमारे दीड लाख रिक्षा कार्यरत आहेत. त्यामुळे या निर्णयाचा परिणाम दररोज रिक्षाने प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांवर होणार आहे.

सीएनजीच्या वाढलेल्या किमती, वाहनांच्या सुट्या भागांचे वाढलेले दर, विमा, देखभाल आणि दुरुस्तीवरील वाढता खर्च तसेच महागाईमुळे सध्याच्या भाडेदरात व्यवसाय करणे परवडत नसल्याचे संघटनांचे म्हणणे होते. या संदर्भात आरटीएने तातडीने बैठक घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून करण्यात आली होती.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या ‘आरटीए’च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत रिक्षा भाडेवाढीबरोबरच परिवहन क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. नवीन दर १ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. मात्र, त्यापूर्वी सर्व रिक्षाचालकांना आपल्या मीटरचे रिकॅलिब्रेशन करून घ्यावे लागणार आहे. नवीन भाडेदरांनुसार मीटरमध्ये आवश्यक बदल झाल्यानंतरच वाढीव भाडे आकारता येणार आहे. हा निर्णय पुणे जिल्ह्यातील सर्व परवानाधारक रिक्षांसाठी लागू राहणार आहे.