पिंपरी- ‘इन्व्हेस्टमेंट फ्रॉड’ आणि ‘ऑनलाइन टास्क’च्या नावाखाली नागरिकांना तब्बल १५० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या आळंदी पोलीस ठाण्याच्या ‘सायबर सेल’ने ही थरारक कारवाई केली. या प्रकरणी मोशी येथून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. या तरुणाच्या नऊ वेगवेगळ्या बँकांमधील खात्यांमधून तब्बल १ कोटी १५ लाख रुपयांचे संशयित व्यवहार उघडकीस आले आहेत.
सचिन संजय काळे (वय २५, रा. मोशी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
आळंदी पोलीस ठाण्याच्या ‘सायबर सेल’ने ही थरारक कारवाई केली. कॉसमॉस बँकेच्या आळंदी शाखेतील एका खात्याचा वापर सायबर फसवणुकीचे पैसे घेण्यासाठी होत असल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली होती. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मोशी येथील गोडाऊन चौकाजवळ सापळा रचून सचिन काळे याला ताब्यात घेण्यात आले.
आरोपी सचिन काळे याने स्वतःच्या नावे वेगवेगळ्या ९ प्रमुख बँकांमध्ये खाती उघडली होती. या सर्व खात्यांचा ताबा त्याने थेट आंतरराज्य सायबर गुन्हेगारांच्या हाती सोपवला होता. या बदल्यात त्याला मोठं कमिशन मिळायचं. खात्यावर फसवणुकीचे पैसे जमा होताच, सचिन ते पैसे एटीएम आणि चेकद्वारे रोकड स्वरूपात काढून थेट टोळीला पोहोचवत असे.
सायबर भामटे फसवणुकीची रक्कम थेट स्वतःच्या खात्यात न घेता, सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक कमिशनचे आमिष दाखवून त्यांची बँक खाती वापरतात. अशा भाड्याने किंवा बेकायदेशीरपणे वापरल्या जाणाऱ्या खात्यांना ‘म्युल अकाउंट’ म्हणतात. राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलनुसार (NCCR), या एकाच रॅकेटद्वारे देशातील तब्बल ६५ नागरिकांची १५० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. या जाळ्यात ६५ नागरिक अडकल्याचे समोर आले आहे.
