पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी १४ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विसर्जन झालेल्या किंवा अर्धवट विसर्जन झालेल्या गणेशमूर्तींचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट किंवा प्रसारित करण्यास बंदी घातली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
नदी, तलाव, कृत्रिम हौद किंवा इतर जलस्रोतांमध्ये विसर्जन केलेल्या गणेशमूर्तींचे किंवा मूर्तींची विल्हेवाट लावतानाचे फोटो, रील्स आणि व्हिडिओ व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर शेअर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम २२३ नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिला आहे.
विसर्जनानंतर काही गणेश मूर्ती पाण्यावर तरंगताना दिसतात किंवा अर्धवट अवस्थेत दिसतात. या सर्व मूर्ती संकलित करुन नंतर त्याचे व्यवस्थापन केले जाते. या प्रक्रियेतील एखादे दृश्य समाज माध्यमावर आल्यास अशा संवेदनशील दृश्यांमुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावण्याची, गैरसमज पसरण्याची आणि सामाजिक सलोखा व कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असते.
हा आदेश १४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ पर्यंत लागू आहे.
