पुणे – केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तीन आरोपींविरोधात तब्बल ५ हजार ५३ पानांचे दोषारोपपत्र वडगाव मावळ न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या हाती या हत्येमागील नियोजनबद्ध कटाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. तसेच दोषारोपपत्रात कटाची आखणी, आरोपींच्या हालचाली, रेकी, बनावट सोशल मीडिया अकाउंट आणि हत्येपूर्वीचे नियोजन यासंदर्भातील माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.
आरोपींनी सुरुवातीला केतनला अपंग करण्याचा प्रयत्न करण्याचा कट रचला होता. त्यानंतर परराज्यातील व्यक्तीच्या माध्यमातून त्याला गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न करण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, बाहेरील व्यक्ती पकडली गेल्यास अडचण निर्माण होऊ शकते, या भीतीने हा निर्णय बदलण्यात आला. या कटाच्या संदर्भातील एका व्यक्तीला पोलिसांनी साक्षीदार केले आहे. त्यानंतर आरोपींनी स्वतःच केतनचा खून करण्याचे ठरवले. यासाठी हत्येशी संबंधित चित्रपट पाहण्यासोबतच पोलिसांपासून कसे वाचता येईल, यासंदर्भातील पॉडकास्टही ऐकण्यात आले. तसेच मेघालयातील सोनम प्रकरणाचाही अभ्यास करण्यात आल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
मार्च २०२६ पासून या हत्येचा कट रचण्यास सुरुवात झाली होती. मे महिन्यात खुनाचा अंतिम प्लॅन करण्यात आला. मे महिन्याच्या अखेरीस सिया आणि चेतन लोणावळ्यात गेले होते. टायगर पॉईंटसह लोणावळ्यातील विविध डोंगर परिसरांची रेकी करण्यात आली. टायगर पॉईंटवर सीसीटीव्ही नसल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. मात्र, अखेर हत्येसाठी लोहगडाची निवड करण्यात आली. मार्च २०२५ मध्ये लोहगडावर एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे केतनचा डोंगरावर सेल्फी घेताना पाय घसरून मृत्यू झाल्याचा बनाव करता येईल, असा विचार आरोपींनी केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
१४ जून रोजी सिया आणि केतन लोहगडावर गेले. यावेळी सियाने केतनला ढकलण्याचा प्रयत्न केला; मात्र तो पडला नाही. त्यानंतर सियाने ‘साप आला’ असा बनाव करून केतनला घाबरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातही त्यांना यश आले नाही. हत्येचा कट तडीला नेण्यासाठी तिघांनी मिळून ‘माही’ नावाचे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार केले. या अकाउंटसाठी ओळखीच्या एका मुलीचा फोटो वापरण्यात आला. १८ जून रोजी या अकाउंटवरून सियाची मैत्रीण असल्याचे भासवून केतनशी संपर्क साधण्यात आला. सियाचा वाढदिवस लोहगडावर साजरा करून तिला सरप्राईज देण्याचे सांगून केतनला लोहगडावर आणण्याचे नियोजन करण्यात आले. हे संपूर्ण नियोजन रितेश हांगे करत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
पाठीमागून धक्का देत केतनला दरीत ढकलले ठरलेल्या नियोजनानुसार चेतन चौधरी हा गडावर जाणाऱ्या दुसऱ्या मार्गाने वर गेला आणि गडावरील मंदिरात जाऊन बसला. त्यानंतर सियाने त्याला खुणावून वर जाण्यास सांगितले. केतनचे लक्ष नसताना सियाने त्याच्या पाठीमागून खांद्याला धक्का दिला, तर चेतनने पायाला धक्का दिला. त्यानंतर चेतनने लाथ मारल्याने केतन खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.या संपूर्ण हत्येचा कट रितेश हांगे याने रचल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले आहे. खून केल्यानंतर ‘माही’ नावाचे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट डिलिट करण्यात आले.
