ब्रेकिंग न्यूज

न्हावरे जवळ स्कूल बस ओढ्यात कोसळली, १५ विद्यार्थी जखमी

Share

न्हावरे- वडगाव रासई- कुरुळी (ता. शिरूर) गावाच्या पश्चिमेला असलेल्या धोकादायक वळणावर विद्यार्थ्यांची स्कूलबस स्टेअरिंग लॉक झाल्याने शनिवारी (ता. १९) दुपारी बाराच्या सुमारास थेट रस्त्यालगतच्या ओढ्यात कोसळली. या अपघातात बसमधील १० ते १५ विद्यार्थी सुदैवाने सुखरूप बचावले.

न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार इंग्लिश मीडियम स्कूलची (एमएच ४३ एच १७८५) ही बस दररोज वडगाव रासाईहून न्हावरे येथे विद्यार्थ्यांची वाहतूक करते. शनिवारी सकाळच्या सत्रातील शाळा असल्याने साडेअकराच्या सुमारास बस न्हावरे येथून ठिकठिकाणी विद्यार्थ्यांना सोडवत वडगाव रासाईच्या दिशेने निघाली होती.

कुरुळी गावाच्या पश्चिमेला असलेल्या धोकादायक वळणावर बस आली असता स्टेअरिंग लॉक झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. काही क्षणांतच बस रस्त्यालगतच्या ओढ्यात कोसळली. बस ओढ्यावरील लोखंडी कठड्यात अडकल्याने सुदैवाने ती उलटली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

अपघाताची माहिती मिळताच पालकांसह मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी दाखल झाले. बसची अवस्था पाहून पालकांनी संताप व्यक्त करीत चालकाला खडे बोल सुनावले. सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली नाही.

अपघातानंतर घाबरलेल्या विद्यार्थ्यांचा आक्रोश आणि घटनास्थळी जमलेल्या पालकांची गर्दी यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

कुरुळीतील हे धोकादायक वळण वारंवारच्या अपघातांमुळे धोक्याचे ठिकाण बनले आहे. याच ठिकाणी यापूर्वी चार अपघात झाले असून, शनिवारी झालेला हा पाचवा अपघात असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.