पुणे- मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील १३ लाख ३२ हजार ४१८ मतदारांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असून, नोटीस मिळालेल्या मतदारांच्या दाव्यांची आणि हरकतींची सुनावणी घेऊन त्यानंतर अंतिम मतदार यादी निश्चित केली जाणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे जिल्ह्यात SIR प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (BLO) घरोघरी जाऊन मतदारांची माहिती तपासली. नाव, पत्ता, छायाचित्र तसेच मतदारांच्या नोंदींची पडताळणी करण्यात आली. याशिवाय अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार नोंदी (ASDD) यांचीही तपासणी करण्यात आली आहे.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या मतदारांच्या नोंदींबाबत पडताळणी किंवा आवश्यक कागदपत्रांची गरज आहे, अशा मतदारांना नोटिसा देण्यात येत आहेत. २४ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबरदरम्यान सुनावणीची प्रक्रिया राबविण्यात येणार असून, २८ सप्टेंबरपासून ती नियमितपणे सुरू होणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नोटिसीमध्ये संबंधित मतदाराला सुनावणीची तारीख, वेळ आणि ठिकाणाची माहिती दिली जाणार आहे. संबंधित मतदारांनी निर्धारित वेळेत उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रे सादर करणे अपेक्षित आहे.
SIR प्रक्रियेत २००२ ते २००४ या कालावधीतील जुन्या मतदार याद्या आधारभूत नोंद म्हणून विचारात घेतल्या जात आहेत. जुन्या मतदार यादीशी संबंधित मॅपिंग उपलब्ध असल्यास अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नसल्याचे पुणे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, ज्या मतदारांची नोंद जुन्या यादीशी मॅप झालेली नाही किंवा नोंदींमध्ये आवश्यक विसंगती आढळली आहे, अशा मतदारांना सुनावणीदरम्यान आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी संबंधित कागदपत्रे सादर करण्याची संधी दिली जाणार आहे.
पुणे जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरदरम्यान दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. नोटिसा आणि दावे-हरकतींची कार्यवाही २९ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केली जाणार असून ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
दरम्यान, पुणे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासण्याचे आवाहन केले आहे. नावात अथवा इतर तपशीलात त्रुटी असल्यास संबंधित प्रक्रियेत दुरुस्ती करता येणार आहे. नवीन मतदारांसाठी अर्ज क्रमांक ६, नाव वगळण्यासाठी अर्ज क्रमांक ७ आणि मतदार तपशीलातील दुरुस्ती अथवा स्थलांतरासाठी अर्ज क्रमांक ८ उपलब्ध आहे.
