पुणे – पुणे महानगरपालिकेने (PMC) लोहगाव आणि निंबाळकर नगर परिसरातील ११ बेकायदेशीर पेइंग गेस्ट (PG) आणि हॉस्टेल सील केले आहेत. ही धडक कारवाई प्रामुख्याने अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणे आणि आवश्यक परवानग्या नसल्यामुळे करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या अग्निशमन, बांधकाम आणि अतिक्रमण विभागाने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.
तपासणीदरम्यान या इमारतींमध्ये कोणतीही कायमस्वरूपी किंवा तात्पुरती अग्निशामक यंत्रणा आढळली नाही. तसेच संचालकांकडे अग्निशामक विभागाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ नव्हते. या हॉस्टेल चालकांकडे बांधकाम परवानगी, स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट, ड्रेनेज आणि पाणी पुरवठ्याची आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नव्हती.
तसेच या ३ ते ४ मजली इमारतींमध्ये १०० हून अधिक विद्यार्थी अत्यंत असुरक्षित वातावरणात राहत असल्याचे समोर आले आहे. पुणे महानगरपालिका आयुक्त नेवल किशोर राम यांच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या जागामालकांवर पोलीस तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू आहे.
काही विद्यार्थ्यांनी सांगितले की त्यांच्या महाविद्यालयांनीच त्यांना या हॉस्टेलचे संदर्भ दिले होते. त्यामुळे अशा असुरक्षित किंवा अनधिकृत हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना पाठवणाऱ्या महाविद्यालयांवरही कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.
दिल्ली आणि इतर शहरांमध्ये घडलेल्या आगीच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम हाती घेण्यात आली असून, येत्या काळात लोहगावसोबतच खराडी, वाघोली आणि इतर शैक्षणिक परिसरांतील सर्व पीजी, हॉस्टेल, कोचिंग क्लासेस आणि ग्रंथालयांचेही फायर ऑडिट व तपासणी केली जाणार आहे.
