ब्रेकिंग न्यूज

ब्रेमेन चौक ते राजीव गांधी पुलादरम्यान उभारणार उड्डाणपूल

Share

पुणे – औंधमधील राजीव गांधी पूल ते ब्रेमेन चौकादरम्यान होणाऱ्या मोठ्या वाहतूक कोंडी सोडवण्याच्या उद्देशाने पुणे महापालिकेने ब्रेमेन चौक ते राजीव गांधी पुलादरम्यान उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन केले आहे. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूदही केली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील वाकड, हिंजवडी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, सांगवी येथील लाखो नागरिक पुण्यामध्ये नोकरी-उद्योग, व्यवसाय व शिक्षणासाठी पुण्यात येतात, तर हिंजवडी, वाकड, चिंचवड येथे लाखो नागरिक याच कारणांसाठी जातात. राजीव गांधी पूल ओलांडून पुण्यात प्रवेश केल्यानंतर ब्रेमेन चौकादरम्यानच्या अरुंद रस्त्यामुळे नागरिकांना सकाळी मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. तर, सायंकाळी पुण्यातून पिंपरी-चिंचवडकडे जाणाऱ्या नागरिकांना ब्रेमेन चौक, ऋषी चौक, औंध पोलीस चौकी ते राजीव गांधी पुलादरम्यान वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. दोन्ही ठिकाणी अरुंद रस्ता, बेशिस्त पार्किंग आणि अतिक्रमणांमुळे ऐन रहदारीच्या वेळी व सायंकाळी वाहनांच्या रांगा लागतात.

या परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून ब्रेमेन चौकातील वाहतूक पाठशाळा ते राजीव गांधी पुलादरम्यान उड्डाणपुलाचे नियोजन केले जात आहे. ब्रेमेन चौकातून नाला जात असल्याने तेथून भुयारी मार्ग करण्याचे टाळून उड्डाणपुलाचे नियोजन केले आहे. उपमहापौर परशुराम वाडेकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाचे प्रमुख दिनकर गोजारे, पथ विभागाचे प्रमुख राजेश बनकर यांनी या ठिकाणांची पाहणी केली आहे.

सविस्तर प्रकल्प अहवालासाठी दोन कोटी
उड्डाणपुलाच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महापालिकेने दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे सल्लागाराची नेमणूक करून उड्डाणपुलाचा अहवाल तयार केला जाणार आहे. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन महापालिकेने संबंधित कामास गती दिल्यास एक ते दीड वर्षात उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल. त्यामुळे औंधमार्गे पिंपरी-चिंचवडकडे जाणाऱ्या आणि पुण्याकडे येणाऱ्या वाहनांचा प्रवास विनाथांबा होणार आहे.