ब्रेकिंग न्यूज

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पुणे विद्यापीठात Gen-Z चा जल्लोष

Share

पुणे – भर पावसात हातात तिरंगा घेत आणि युवा शक्तीचा विजय असो, अशा घोषणा देत विद्यार्थी, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर रविवारी जल्लोष साजरा केला. या आनंदोत्सवामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परिसर दुमदुमून गेला.

पेपरफुटीच्या घटना, शिक्षणाचे वाढते खासगीकरण आणि वाढती बेरोजगारी या मुद्द्यांवर पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’चे अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली देशभर आंदोलन सुरू होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला.

या आंदोलनाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पुण्यात विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील कलाकार कट्टा, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर तसेच शिवाजीनगर येथील काँग्रेस भवनात विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी केली.

‘भारत माता की जय’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘जय भीम’, ‘छात्र एकजुटीचा विजय असो’, ‘शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’ अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. हातात डौलाने फडकणारा तिरंगा आणि एकमेकांना ‘मेलोडी’ चॉकलेट भरवत उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थी, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. तसेच ‘नीट’ पेपरफुटीच्या नैराश्यातून देशभरात २२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. या सर्व हुतात्मा विद्यार्थ्यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या स्मरणार्थ काही काळ शांतता पाळून मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या.

गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या जंतरमंतरवर सीजेपीचे अभिजित दीपके आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होते. कोणत्याही राजकीय पक्षाच्या पाठिंब्याशिवाय केवळ विद्यार्थी ताकदीच्या जोरावर मिळालेला हा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. हा केवळ एका मंत्र्याच्या राजीनाम्याचा आनंद नसून, देशाच्या शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्याच्या प्रदीर्घ लढ्याची सुरुवात असल्याची भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

या वेळी आमदार रोहित पवार यांच्‍यासह राहुल डंबाळे, योगेश इंगळे, डॉ. राहुल ससाणे, नितीन आंधळे, राहुल नागटिळक, सुवर्णा डंबाळे आदी उपस्थित होते. नीट परीक्षेतील अन्यायाविरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेला हा लढा ऐतिहासिक आहे. या एकजुटीने सत्ताधाऱ्यांचा आणि अंधभक्तांचा अहंकार मोडून काढला, असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. हा लढा राजकीय पक्षांचा नसून, सामान्य घरातील मुलांचा होता. आगामी काळातही संविधानाच्या रक्षणासाठी आणि अन्यायाविरुद्ध अशीच एकजूट दाखवा, असे आवाहन पवार यांनी केले.