बारामती- घरातील झोपण्याच्या खोलीत शिरून विवाहितेच्या डोक्यात व चेहऱ्यावर अज्ञात हत्याराने मारहाण करून, तसेच टॉवेलने गळा आवळून खून केल्याची थरारक घटना बारामती तालुक्यातील पणदरे येथे काल शनिवारी सायंकाळी उघडकीस आली.
वैशाली तानाजी पवार (वय 30, रा. पणदरे) असं हत्या झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी मृत विवाहितेची सासू रंजना लक्ष्मण पवार (वय 50, रा. खडकआळी, पणदरे) यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पणदरे गावच्या हद्दीत वैशाली पवार या त्यांच्या राहत्या घरातील झोपण्याच्या खोलीत होत्या. काल शनिवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणातून हल्ला केला. डोक्यात व चेहऱ्यावर हत्याराने मारहाण केल्यानंतर टॉवेलने गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आल्याचं फिर्यादीत नमूद आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर माळेगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला.
उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ हे तपास करीत आहेत. हत्या कोणत्या कारणातून झाली? तसेच आरोपी कोण आहे? याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
