ब्रेकिंग न्यूज

ट्रकमध्ये कंपोस्ट खत असल्याचे सांगितले, पण बॉक्स उघडताच सापडला ७९ लाखांचा गुटखा

Share

पिंपरी- गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा शिरगाव परंदवडी पोलिसांनी पर्दाफाश केला. टेम्पो मधून गुटख्याचे बॉक्स घेऊन जाणाऱ्या या टोळीकडून तब्बल ७९ लाख ४६ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही घटना नवीन उर्से टोलनाक्याजवळ घडली.

या प्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालक अमजदुद्दीन ऐनुलहक चौधरी (राहणार – कर्नाटक, मूळ गाव – त्रिपुरा) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांना णे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरून एका आयशर टेम्पोमधून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा पुण्याहून मुंबईकडे जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी पोलीस स्टाफसह पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी आणि वाहन तपासणी सुरू केली.

दरम्यान, नवीन उर्से टोलनाक्याजवळ मुंबईकडे जाणारा लाल रंगाचा आयशर टेम्पो पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी तात्काळ टेम्पो थांबवून चालकाकडे वाहनातील मालाबाबत चौकशी केली. चालकाने सुरुवातीला वाहनामध्ये वर्मी कंपोस्ट खत असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र चालकाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी वाहनाची तपासणी केली.

वाहनाचा दरवाजा उघडून पाहणी केली असता, पांढऱ्या रंगाच्या पोत्यांमध्ये मोठमोठे बॉक्स आढळून आले. हे बॉक्स उघडले असता त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला रजनिगंधा गुटखा, तुळशी सुगंधी तंबाखू आणि वर्मी कंपोस्ट खताचे गोणी आढळून आले. ४२ लाख ४३ हजार २०० रुपयांचा रजनीगंधा गुटखा तसेच सुगंधी तुळशी तंबाखू १४ लाख ४० हजार आणि वर्मी कंपोस्ट खत २ लाख ६३ हजार १२० रुपये असा ऐकून ७९ लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या मोठ्या कारवाईमुळे राज्यातील गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत.