बारामती- महिलेसोबत असलेले प्रेमसंबंध तिच्या पतीला समजल्यानंतर मानसिक धक्का बसलेल्या तरुणाने स्वतःवर गोळी झाडून घेतली. ही घटना बारामती शहरातील सूर्यनगरी परिसरात घडली. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना आज रविवारी सकाळी मृत्यू झाला.
आविष्कार अमोल ढोले (वय १९, मूळ रा. कुरवली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आविष्कार ढोले हा बारामतीतील सूर्यनगरी परिसरातील जयश्री अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याचे गावातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधाची माहिती महिलेच्या पतीला समजल्यानंतर तो तणावात होता. काल शनिवारी दुपारी साडेतीन ते पावणेचारच्या दरम्यान त्याने राहत्या खोलीत स्वतःकडील पिस्तूलातून डोक्यात गोळी झाडून घेतली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या ढोले याला उपचारासाठी प्रथम बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
नंतर पुढील उपचारासाठी पुण्यात ससून रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना आज रविवारी सकाळी सहाच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम करीत आहेत.
