मोशी- संतनगर मित्र मंडळ, मोशी-प्राधिकरण यांनी २०२५ चा साजरा केलेला डीजे मुक्त, पर्यावरणपूरक गणेशोत्सव राज्यभर चर्चेचा विषय ठरला असून, Environment Conservation Association (ECA) च्या वतीने मंडळास प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे.
मंडळाने आधुनिक डीजे संस्कृतीला फाटा देत वारकरी संप्रदायाची गेली २० वर्षे परंपरा जपली. टाळ-मृदंगाच्या अखंड गजरात, पारंपरिक वाद्यांच्या साथीने आणि भजन-कीर्तनातून गणेशोत्सव साजरा करून ध्वनी प्रदूषणमुक्त उत्सवाचा आदर्श निर्माण केला.
केवळ १० दिवसांचा उत्सव न मानता, मंडळाने भूगोल फाउंडेशनच्या सहकार्याने वर्षभर पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम राबविले आहेत. यामध्ये प्लास्टिक मुक्त मोहीम, निर्माल्यापासून खत निर्मिती, वृक्षारोपण वृक्षसंवर्धन,गडकिल्ले स्वच्छता, नदी स्वच्छता जनजागृती आणि शाडू मातीच्या मूर्तीचा वापर यांचा समावेश आहे.
“गणेशोत्सव म्हणजे मोठा आवाज नव्हे, तर भक्ती आणि सामाजिक बांधिलकी आहे. सर्व मंडळांनी डीजे मुक्त, पर्यावरणपुरक परंपरा जपून वारकरी परंपरेचा वारसा पुढे न्यावा,” असा संदेश मंडळाचे अध्यक्ष विठ्ठलनाना झुंबरशेठ वाळुंज यांनी दिला.
हा पुरस्कार मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या,हितचिंतकांच्या, देणगीदारांच्या अथक मेहनतीचा आणि पुणे, पिंपरी-चिंचवडकरांच्या सहकार्याचा सन्मान असल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले.
