साताऱ्याजवळ महालक्ष्मी एक्सप्रेसवर धाडसी दरोडा ; गाडी थांबवून खिडकीजवळ बसलेल्या महिला प्रवाशांचे दागिने लुटले

सातारा- पुणे-मिरज रेल्वे मार्गावर रविवारी पहाटेच्या सुमारास महालक्ष्मी एक्स्प्रेसवर धाडसी दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली. सातारा जिल्ह्यातील सालपे गावाच्या हद्दीत चोरट्यांनी सिग्नल यंत्रणेची वायर कापून तांत्रिक बिघाड केला आणि रेल्वे सुमारे १५ मिनिटे रोखून धरली. खिडकीजवळ बसलेल्या महिला प्रवाशांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून ८ ते १० दरोडेखोरांची टोळी घटनास्थळावरून पसार झाली.
रेल्वे थांबल्यानंतर संधी साधून चोरट्यांनी खिडकीमध्ये बसलेल्या महिला प्रवाशांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेले. तसेच डब्यात शिरून हिसकावून घेण्यात आले. दरोडेखोरांनी आरक्षित डब्यांना (विशेषतः S-2, S-3 आणि S-5) आपले लक्ष्य केले. साखरझोपेत असलेल्या महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खिडकीतून हात घालून आणि डब्यात शिरून हिसकावून घेण्यात आले.
प्रवाशांनी आरडाओरडा केल्यावर चोरट्यांनी इतरांना धाक दाखवण्यासाठी डब्यांवर दगडफेक केली आणि जंगलाचा फायदा घेत अंधारात पसार झाले. घटना घडलेला सालपे गावाचा हद्दीतील परिसर हा अत्यंत डोंगराळ भाग आहे. या भौगोलिक परिस्थितीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव या पट्ट्यात रेल्वेचा वेग ताशी ५५ किलोमीटर इतका मर्यादित ठेवला जातो. याच गोष्टीचा फायदा घेत चोरट्यांनी आपला डाव साधला.
या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. या प्रकरणी मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यात (GRP) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांची पथके दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी सातारा जिल्ह्यात रवाना झाली आहेत.






