हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो ४ नोव्हेम्बर पासून धावणार ; ही १७ स्थानके प्रवाशांसाठी खुली होणार

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो ४ नोव्हेम्बर पासून धावणार ; ही १७ स्थानके प्रवाशांसाठी खुली होणार
Share

माण- हिंजवडी ते शिवाजीनगर ‘पुणेरी मेट्रो’ (पिंक लाईन) मार्गिकेवरील १७ स्थानके प्रवाशांसाठी खुली होणार
पिंपरी- बहुप्रतीक्षित पुणे मेट्रो लाईन-३ माण–हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गिकेचे लोकार्पण दि. ३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअली होणार आहे. त्यानंतर ४ नोव्हेंबर पासून ही मेट्रो प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. एकूण २३ स्थानकांपैकी १७ स्थानके दि. ३ नोव्हेंबरपासून प्रवाशांसाठी खुली केली जाणार आहेत. याबाबतची माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे (पीआयटीसीएमआरएल) मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सैनी, पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) रिनाज पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे सकाळी साडेदहा वाजता हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

या प्रकल्पातील एकूण २३ स्थानकांपैकी १७ स्थानके दि. ३ नोव्हेंबरपासून प्रवाशांसाठी खुली केली जाणार आहेत. यापैकी सात स्थानकांवर एक जिना खुला राहणार आहे. त्यामध्ये स्थानक क्रमांक १ (माण), २ (माण-एमआयडीसी सर्कल फेज-२), ३ (माण-बस डेपो), ५ (हिंजवडी फेज-२ सर्कल-१), ६ (पद्मभूषण चौक), २१ (कृषी महाविद्यालय) आणि २३ (जिल्हा व सत्र न्यायालय) यांचा समावेश आहे. उर्वरित दहा स्थानकांवर दोन्ही जिने प्रवाशांसाठी खुले असतील. त्यामध्ये स्थानक क्रमांक ४ (हिंजवडी फेज-२ सर्कल-२), ७ (श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक, हिंजवडी), ८ (हिंजवडी फेज-१), ९ (वाकड चौक), १० (श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे), ११ (मिटकॉन, बालेवाडी), १२ (आर. के. लक्ष्मण म्युझियम, बालेवाडी), १७ (औंध), १८ (सकाळनगर) आणि १९ (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांचा समावेश आहे. उर्वरित सहा स्थानकांपैकी १३ आणि १४ क्रमांकाच्या स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात असून, ते नोव्हेंबर २०२६ अखेर पूर्ण होईल. तर १५, १६, २० आणि २२ क्रमांकाची उर्वरित चार स्थानके आणि त्यांचे जिने जानेवारी २०२७ पर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ण करून प्रवासी सेवेत दाखल केले जातील.

४ नोव्हेंबरपासून मेट्रोची पहिली फेरी सकाळी ६ वाजता सुरू होईल. माण स्थानकावरून जिल्हा न्यायालयाच्या दिशेने जाणारी शेवटची मेट्रो रात्री १०.३० वाजता, तर जिल्हा न्यायालय स्थानकावरून माणच्या दिशेने जाणारी शेवटची मेट्रो रात्री ११.४० वाजता सुटेल. गर्दीच्या वेळेत दर सहा मिनिटांनी, तर इतर वेळेत दर १२ मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असेल.

पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) नागरिकांच्या सोयीसाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो स्थानकांजवळ पार्किंगची व्यवस्था विकसित केली आहे. बालेवाडी येथील पीएमआर-११ स्थानकाजवळ अमर टेक पार्क परिसरात सुमारे ३० हजार चौरस फूट क्षेत्रावर पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, बाणेर येथील पीएमआर-१४ स्थानकाजवळील एबीझेड परिसरात २१ हजार चौरस फूट क्षेत्रावर पार्किंग विकसित करण्यात आले आहे. या सुविधांमुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार असून, परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होईल, असेही रिनाज पठाण यांनी सांगितले.

Vedh News