पुण्यातील प्रसिद्ध ‘झांबरे पॅलेस’च्या मालकाच्या सुनेची गळफास घेऊन आत्महत्या, झांबरे पॅलेसची तोडफोड

पुण्यातील प्रसिद्ध ‘झांबरे पॅलेस’च्या मालकाच्या सुनेची गळफास घेऊन आत्महत्या, झांबरे पॅलेसची तोडफोड
Share

पुणे- पुण्यातील मुकुंदनगर परिसरातील ‘अक्षय हाइट्स’ सोसायटीमध्ये एका ३० वर्षीय उच्चशिक्षित विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पायल अक्षय झांबरे असे मृत महिलेचे नाव असून त्या एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत होत्या. या घटनेने संतप्त झालेल्या पायलच्या माहेरच्या नातेवाइकांनी ‘झांबरे पॅलेस’ची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पायल यांचा मृतदेह जुन्या फ्लॅटमध्ये छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेनंतर पतीसह सासू-सासरे फरार झाल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. या घटनेनंतर पायल यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी अत्यंत गंभीर आरोप केले असून हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पायल या अत्यंत उच्चशिक्षित, समजूतदार आणि शांत स्वभावाच्या असल्याने त्या स्वतःहून असा टोकाचा आत्मघाती निर्णय घेऊच शकत नाहीत, असा ठाम दावा माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मृत पायल यांचे चुलत भाऊ जनार्दन पवार यांनी सांगितले की, लग्नानंतर काही काळापासूनच सासरच्या मंडळींकडून सतत सोन्याची आणि मोठ्या रकमेच्या पैशांची अतिरिक्त मागणी केली जात होती. या आर्थिक व हुंड्याच्या हव्यासापोटी सासरच्या लोकांनी पायल यांचा प्रचंड शारीरिक आणि मानसिक छळ केला असा आरोप केला जात आहे.

पायल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर संतप्त झालेल्या माहेरच्या नातेवाइकांनी त्यांच्या सासरच्या घरावर आणि झांबरे पॅलेसची तोडफोड केल्याचा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर फरार झालेल्या सासरच्या मंडळींचा शोध आणि शवविच्छेदन अहवालानंतरच या मृत्यूमागील नेमके गूढ उकलणार आहे.

Vedh News