पुण्यात १५ नोव्हेंबर रोजी पुणे राष्ट्रीय एकता दौड ; अमित शाह यांच्या हस्ते ‘फ्लॅग ऑफ’

पुण्यात १५ नोव्हेंबर रोजी पुणे राष्ट्रीय एकता दौड ; अमित शाह यांच्या हस्ते ‘फ्लॅग ऑफ’
Share

पुणे- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते १५ नोव्हेंबर रोजी ‘पुणे रन फॉर युनिटी २०२६’ अर्थात पुणे राष्ट्रीय एकता दौडचा फ्लॅग ऑफ करण्यात येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून आयोजित या मॅरेथॉनमध्ये ४० हजारांहून अधिक नागरिक सहभागी होणार असून, केनियासह आफ्रिकन देशांतील आंतरराष्ट्रीय धावपटूही सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही यावेळी उपस्थिती राहणार आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी या दौडचे आयोजन केले आहे. यंदा या उपक्रमातून ‘नशामुक्त युवा, सशक्त युवा आणि विकसित भारत’ हा संदेश दिला जाणार आहे. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा, हा यामागील उद्देश आहे. या मॅरेथॉनमध्ये २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन, १० मैल स्पर्धात्मक धाव, १० किलोमीटर स्पर्धात्मक धाव, ५ किलोमीटर फन रन आणि ३ किलोमीटर फॅमिली व बिगिनर रन अशा पाच गटांत स्पर्धा होणार आहेत.

व्यावसायिक धावपटूंसह विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबीयांनाही सहभागी होता येणार आहे. विजेत्यांना १० लाख रुपयांहून अधिक रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या स्पर्धेत २५ हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. यंदा हा आकडा ४० हजारांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. शैक्षणिक संस्था, क्रीडा संघटना, सामाजिक संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचाही सहभाग अपेक्षित आहे.

गेल्या वर्षी २५ हजार पुणेकर सहभागी झाले होते. यंदा ४० हजारांहून अधिक नागरिक सहभागी होतील, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री आणि मुख्य संयोजक मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.

Vedh News