बारा दिवसांच्या मांगल्यपूर्ण उत्सवाचा शानदार प्रारंभ ! बाप्पांच्या स्वागतासाठी उद्योगनगरीमध्ये जल्लोषाला सुरुवात
पिंपरी- पिंपरी-चिंचवडमध्ये श्री गणेशाच्या आगमनाची तयारी पूर्ण झाली असून अनेक घरातून सकाळीच बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. सार्वजनिक गणेश मंडळा दुपारपासून मिरवणूक काढून बाप्पांचे भव्य दिव्य स्वरूपात स्वागत केले जाईल. शहराच्या विविध भागात गणेशमूर्तींनी सजलेले स्टॉल्स पाहायला मिळत आहेत. पूजा साहित्याची, हार, फुले इत्यादींच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाजारपेठेत उतरले आहेत. एकूणच संपूर्ण शहरात एक वेगळाच चैतन्यमय माहौल पाहायला मिळत आहे.
बाप्पांच्या स्वागतासाठी उद्योगनगरीत वातावरण भक्तिमय झालेले आहे. घरोघरच्या गणपतीच्या सजावटीसाठी बाजारात विविध प्रकारची मखरे, रंगबिरंगी आकर्षक कागदी फुले, टिश्यू फुले, कृत्रिम फुलांच्या माळा, लुकलुकणाऱ्या विद्युत माळा, सजावटीचे रंगीत कापड, नवनवीन प्रकारचे सजावटीच्या साहित्यांनी पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, आकुर्डी मधील बाजारपेठ सजली आहे. शहराच्या सर्व भागातील बाजारपेठेमध्ये खरेदीचा उत्साह ओसंडून वाहत आहे.
शहरातील मानाच्या आणि प्रमुख गणेश मंडळांचे भव्य देखावे आणि आकर्षक कमानी उभारण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून बाप्पांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्याची तयारी कार्यकर्त्यांकडून सुरु आहे. पारंपरिक पोशाख करून बाप्पांच्या स्वागतासाठी मंडळाचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. यंदा काही मंडळांनी विद्युत रोषणाईचा देखावा केला आहे तर काही मंडळांकडून जिवंत देखावे सादर करण्यात येणार आहेत. मागील महिनाभर शहराच्या विविध भागात ढोल ताशांचा सराव सुरु होता. आता प्रत्यक्ष मिरवणुकीत ढोल ताशांचा दणदणाट ऐकायला मिळणार आहे.
पुण्यात विद्यानंद बापट यांनी डिजेच्या विरोधात आवाज उठवला आहे. त्याला सर्वसामान्य नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. डीजेच्या विरोधात नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले होते. पोलिसांकडून देखील डीजेच्या आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळावर कडक कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे या सर्वांचा परिणाम यंदाच्या उत्सवात पाहायला मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
