पिंपरी- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या ‘हरित सेतू’ प्रकल्पाबाबत नागरिकांच्या मनातील शंका व प्रश्नांचे निरसन करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनातर्फे उद्या शुक्रवारी, दि. ११ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी २९ ऑगस्ट २०२६ रोजी पत्राद्वारे महापालिका प्रशासनाकडे हरित सेतू प्रकल्पावरून नागरिकांमध्ये असलेले प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्यक्ष संवाद बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाने या संदर्भात अधिकृत पत्र जारी केले आहे.
उद्या शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६रोजी सकाळी १०.३० वाजता पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमधील कै. मधुकरराव पवळे सभागृहात ही बैठक होणार आहे. या बैठकीस मनपा आयुक्त, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, प्रभाग क्रमांक १५ मधील लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे उच्चाधिकारी उपस्थित राहणार आहेत. हरित सेतू प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत स्थानिक नागरिकांचे म्हणणे ऐकून घेणे आणि प्रकल्पाची योग्य माहिती देऊन शंकांचे निरसन करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे.
