ब्रेकिंग न्यूज

पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचे अपहरण, काही तासातच तरुणाची पोलिसांकडून सुटका

Share

पुणे- पुण्याच्या मध्यवर्ती भागात मध्यरात्री एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाला स्कॉर्पिओमधून जबरदस्तीने पळवून नेण्यात आले. “तू माझ्या मैत्रिणीसोबत का बोलतोस?” या कारणावरून मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र पोलिसांनी तत्परतेने तपास करत काही तासांतच या तरुणाची सुटका केली. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून, अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.

पुण्यातील पेरूगेट पोलीस चौकीच्या ( Pune Crime News)हद्दीतून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २८ वर्षीय तरुणाचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना घडली. डायल ११२ वर अपहरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू करून नाकाबंदी आणि पाठलाग केला. अवघ्या ५३ मिनिटांत सिंहगड रोडच्या दिशेने जाणाऱ्या आरोपींच्या तावडीतून तरुणाची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

प्रसाद सूर्यवंशी (वय २८) असे अपहरणातून सुटका करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात सागर रमेश बोराडे (वय ३२, हॉटेल व्यावसायिक, रा. वालचंदनगर) आणि किशोर बाळासाहेब सावंत (वय ३२, रा. दसर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील अन्य दोन साथीदार अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद सूर्यवंशी पुण्यात राहून एमपीएससी परीक्षेची तयारी करतो. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास तो चिमण्या मारुती चौक परिसरात उभा होता. त्यावेळी चारचाकीतून काही जण तेथे आले. आरोपींनी प्रसादला “तू माझ्या मैत्रिणीसोबत का बोलतोस?” असा जाब विचारला. त्यानंतर त्याच्याशी वाद घालत मारहाण केली. त्यानंतर प्रसादला जबरदस्तीने स्कॉर्पिओमध्ये बसवून त्याला पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

मध्यरात्री सुमारे साडेबारा वाजता प्रसाद सूर्यवंशी याचे अपहरण झाल्याची माहिती डायल ११२ वरून पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करत वाहनाचा माग काढून पाठलाग सुरू केला. रात्री दीडच्या सुमारास सिंहगड रोडच्या दिशेने जाणाऱ्या आरोपींच्या तावडीतून प्रसादची सुटका करण्यात पोलिसांना यश आले. सुटका झाल्यानंतर प्रसादची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणात एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार असलेल्या दोन साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, एमपीएससीची तयारी करणारी एक तरुणी प्रसाद आणि मुख्य आरोपी या दोघांच्या संपर्कात होती. दोघांशीही तिचे फोनवरून बोलणे होत असल्याचे आरोपीच्या लक्षात आले. याचा राग मनात धरून त्याने प्रसादचे अपहरण करण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.