कपडे वाळत घालताना तारेतील वीजप्रवाहामुळे महिलेचा जागीच मृत्यू, थेऊरमधील दुर्दैवी घटना

कपडे वाळत घालताना तारेतील वीजप्रवाहामुळे महिलेचा जागीच मृत्यू, थेऊरमधील दुर्दैवी घटना
Share

पुणे- कपडे धुवून झाल्यावर नेहमीप्रमाणे ते वाळत घालताना विजेचा धक्का लागून ४० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना थेऊरच्या काकडे कॉलनीमध्ये शनिवारी (दि. ३१) रोजी दुपारच्या सुमारास घडली. महिलेचा मुलगा शाळेतून घरी आला तेव्हा ही घटना उघडकीस आली.

सीमा विकास नरुटे (वय ४०, रा. काकडे कॉलनी, थेऊर) असे या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली नरुटे या घराच्या मागील अंगणात धुवून झालेले कपडे लोखंडी तारेवर वाळत घालत होत्या. त्यावेळी लोखंडी तारेमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्यांना तीव्र विजेचा धक्का बसला. या धक्क्याने त्या जमिनीवर कोसळल्या. सीमा यांचा मुलगा शाळेतून घरी आला तेव्हा आईला जमिनीवर पडलेलं पाहून त्याला धक्का बसला. नागरिकांनी लगेचच महावितरणाला माहिती दिली आणि वीजपुरवठा बंद करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच सीमा यांना लगेचच लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शेजारील प्लॉटींगमधील बोअरवेलच्या विद्युत मीटरला जोडलेल्या वायरमध्ये बिघाड झाल्याने लोखंडी तारेत वीजप्रवाह उतरल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वायरचे घर्षण होऊन ती कट झाल्याची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी पाहणीनंतर व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा विद्युत निरीक्षकांमार्फत सखोल तपास केला जाणार आहे.

थेऊर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव, उपनिरीक्षक योगेश पैठणे आणि महेश कारे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव करीत आहेत.

Vedh News