सीबीएसई राष्ट्रीय एरोबिक्स स्पर्धेत हेवन स्पोर्ट्सच्या राही फूलतांबकरला सुवर्ण, तर अंजनेय नखातेला कांस्यपदक

पिंपरी- पिंपरी-चिंचवडच्या सीबीएसई राष्ट्रीय एरोबिक्स अजिंक्यपद स्पर्धेत हेवन स्पोर्ट्स अँड फिटनेस अकादमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या स्पर्धेत राही फूलतांबकर हिने सुवर्णपदक, तर अंजनेय नखाते याने कांस्यपदक पटकावले आहे.
पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथील एसएनबीपी समूहाच्या वतीने दिनांक २७ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सीबीएसई राष्ट्रीय एरोबिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा महोत्सवात देशभरातील तसेच परदेशातील सीबीएसई शाळांमधील २,५०० हून अधिक विद्यार्थी खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
या स्पर्धेत पोदार इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड येथून सहभागी झालेल्या राही फूलतांबकर हिने १४ वर्षांखालील वयोगटातील एरोबिक्स प्रकारात ८.८० गुण मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तसेच एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, रहाटणी येथून सहभागी झालेल्या अंजनेय नखाते याने याच वयोगटात ८.४८ गुण मिळवत कांस्यपदकाची कमाई केली.
विशेष म्हणजे, हे दोन्ही खेळाडू हेवन स्पोर्ट्स अँड फिटनेस अकादमीमध्ये नियमित सराव करतात. राही गेल्या पाच वर्षांपासून, तर अंजनेय गेल्या तीन वर्षांपासून अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण सरावाचे, शिस्तीचे आणि मेहनतीचे हे यशस्वी फलित असल्याचे मत क्रीडाक्षेत्रातून व्यक्त होत आहे.
या स्पर्धेत अकादमीच्या इतर खेळाडूंनीही चांगली कामगिरी केली. रिया पळे हिने १४ वर्षांखालील वयोगटात पाचवा क्रमांक, तर आर्वी कोल्हे हिने दहावा क्रमांक मिळविला. सिद्धी मारे हिनेही उत्कृष्ट सादरीकरण करत स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला.
खेळाडूंच्या या यशामागे त्यांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण, योग्य मार्गदर्शन, कठोर परिश्रम आणि पालकांचे सहकार्य यांचा मोलाचा वाटा आहे. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक हर्षद कुलकर्णी यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले, तर खेळाडूंच्या तयारीचे व स्पर्धेतील सहभागाचे संपूर्ण नियोजन वृंदा सुतार यांनी केले.
या यशाबद्दल हेवन स्पोर्ट्स अँड फिटनेस अकादमीच्या सर्व पालकांनी, संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी, अकादमीचे सहाय्यक मंदार फणसाळकर, व्यवस्थापक व प्रशिक्षक चैतन्य कुलकर्णी, प्रशिक्षक आश्लेषा ढाके तसेच इतर मान्यवरांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.






