पुणे- हत्या प्रकरणातील अल्पवयीन आरोपींना वाहनाच्या बोनेटला बांधून त्यांची धिंड काढणे आणि दुसऱ्या प्रकरणात आरोपींना गुडघ्यांवर चालायला लावत मारहाण करणे पुणे पोलिसांना चांगलेच महागात गेले आहे. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने पुणे पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह १५ पेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांवर मानवाधिकार आयोगाने गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे.
पुणे पोलिसांवर महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर ताशेरे ओढले आहेत. हत्या प्रकरणातील अल्पवयीन आरोपींना वाहनाच्या बोनेटला बांधून त्यांची धिंड काढल्याचा आरोप आहे. तसेच दुसऱ्या प्रकरणात आरोपींना रस्त्यावर गुडघ्यावर बसवून आणि गुडघ्यांवर चालायला लावत मारहाण करण्यात आली. या दोन्ही घटनांमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्याचे आयोगाने म्हटले आहे.
या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे हे आरोपींना अशा प्रकारे वागणूक देण्यास प्रवृत्त करण्यास तसेच मानवाधिकारांच्या उल्लंघनास जबाबदार असल्याचे आयोगाने म्हटले आहे. आयोगाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे पोलीस आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याची शिफारस पोलिस महासंचालकांकडे केली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास अतिरिक्त पोलीस महासंचालक किंवा त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवावा, अशीही शिफारस करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण ?
ऑगस्ट २०२६ मध्ये पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करत एका खुनाच्या गुन्ह्यातील संशयित अल्पवयीन आरोपींची कारच्या बोनटला बांधून धिंड काढली होती. दुसऱ्या एका प्रकरणात आरोपीना रस्त्यावरून गुडघ्यावर चालायला लावले होते. या कारवाईचा उद्देश गुन्हेगारीला आळा घालणे आणि कायद्याचा धाक निर्माण करणे असल्याचे सांगितले गेले. मात्र या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच शहरभर उलट सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या. या व्हिडिओमुळे अल्पवयीन मुलांची ओळख उघड झाली का आणि त्यांना दिलेली वागणूक बाल संरक्षण कायद्यानुसार योग्य होती का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले.
त्यानंतर राज्य मानवाधिकार आयोगाच्या अधिकाऱ्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पोहोचून चौकशीला सुरुवात केली. हायकोर्टाच्या निर्देशानंतर एका पोलीस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एक पथक तयार करण्यात आले. हे पथक मुंबईहून पुण्यात दाखल झाले आणि त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. ज्यांनी या मुलांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले होते त्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची चौकशी केली. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने पुणे पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
