किरकोळ वादातून डोक्यात दगड घालून रिक्षाचालकाचा खून, पुण्यातील काशेवाडी येथील घटना

किरकोळ वादातून डोक्यात दगड घालून रिक्षाचालकाचा खून, पुण्यातील काशेवाडी येथील घटना
Share

पुणे – जुन्या वादातून रिक्षाचालक तरुणाला बेदम मारहाण करून त्याच्या डोक्यात दगड घातला. यानंतर रिक्षाचालक तरुणाला चक्कर येऊ लागल्यामुळे त्याच अवस्थेत तो घरी गेला आणि झोपून गेला. मात्र, सकाळी बराच उशीर झाला तरी तो उठलाच नाही. यामुळे घरचे त्याच्या जवळ गेले आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणाचा मृत्यू झाला होता. ही भयंकर घटना भवानी पेठेतील काशेवाडी परिसरात घडली.

अस्लम युसूफ खान (वय ३०, रा. चमनशहा दर्ग्याजवळ, काशेवाडी, भवानी पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अस्लमचा मोठा भाऊ मुझम्मील खान (वय ३३) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अमोल अंबवणे याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्लम रिक्षाचालक होता. यासोबतच तो गॅरेजमध्ये रिक्षादुरुस्तीचे कामही करायचा. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) त्याचा अमोल अंबवणे नावाच्या तरुणासोबत वाद झाला होता. याच रागातून रात्री साडेअकराच्या सुमारास अस्लम काशेवाडी परिसरातून जात असताना चमनशहा दर्ग्याजवळ अंबवणे याने त्याला अडवले. इथे दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यादरम्यान अंबवणे याने अस्लमला मारहाण करून त्याच्या डोक्यात दगड घातला.

डोक्यातला वार इतका जबर होता, की अस्लमला चक्कर आली. तो त्याच अवस्थेत घरी गेला आणि झोपला. मात्र, शनिवारी सकाळी तो बराच वेळ उठला नाही. यामुळे घरातील लोकांनी त्याला जागे करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. घरच्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कुटुंबीयांनी अधिक चौकशी केली असता अस्लमला अमोल अनिल अंबवणे याने मारहाण केली असल्याची माहिती मिळाली. यानंतर अस्लमचा मोठा भाऊ मुझम्मील खान (वय ३३) यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तपास करून पसार झालेल्या अमोल अंबवणे याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक समाधान पवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Vedh News