भांडणे मिटवू असे सांगून १६ वर्षाच्या मुलावर कोयत्याने वार, ६ अल्पवयीन मुलांना डेक्कन पोलिसांच्या ताब्यात

भांडणे मिटवू असे सांगून १६ वर्षाच्या मुलावर कोयत्याने वार, ६ अल्पवयीन मुलांना डेक्कन पोलिसांच्या ताब्यात
Share

पुणे- एक वर्षांपूर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने झालेला वाद मिटवू असे सांगून अल्पवयीन मुलांनी एका १६ वर्षाच्या मुलावर कोयत्यांनी वार करुन त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी ६ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेत शौर्य विशाल मोहिते (वय १६, रा. घोरपडी पेठ) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन फिर्याद घेतली आहे. ही घटना भिडे पुलाजवळ २ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शौर्य मोहिते हा गरवारे कॉलेजमध्ये ११ वीमध्ये शिकत आहे. तो दहावीत असताना परीक्षेला सिमला ऑफिस येथील भारत इंग्लिश स्कुल येथे त्याचा नंबर लागला होता. पेपर चालू असताना त्याच्या शाळेतील मित्रांबरोबर त्याचे किरकोळ कारणावरुन वाद झालेले होते. त्यावेळी त्यांनी शौर्य याला शाळेच्या आवारात मारहाण केली होती. त्याचा व्हिडिओ बनवला होता. शाळेच्या बाहेर आल्यावरही त्याला मारहाण करणारी मुले त्याचा पाठलाग करु लागली.

तेव्हा तो भीतीने शिवाजीनगर पोलीस चौकीत गेला. तेथून फोन केल्यावर त्याचे वडील आले. त्याला मारहाण करणार्‍या मुलांचे आईवडिल आले. त्यावेळी त्यांच्यात आपआपसात समझोता होऊन भांडण मिटली. पोलिसांनी त्यांना समज देऊन सोडून दिले होते. याचा राग त्या मुलांनी मनात धरला होता. त्यानंतर शिवाजीनगर येथील वृद्धेश्वर घाट येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी मागची भांडणे मिटविण्यासाठी आले असता त्यांच्यात पुन्हा भांडणे झाली.

२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी शौर्य हा मित्रांबरोबर फिरायला गेला होता. त्याला भिडे पुलाजवळ भेटायला बोलावले. तो मित्राबरोबर भिडे पुला जवळ गेला. तेव्हा भारत इंग्लिश स्कुलमध्ये त्याला मारहाण करणार्‍या मुलांनी तू आमची नावे पोलिसांना का सांगितली, असे म्हणून शिवीगाळ करुन कमरेला लावलेला कोयता काढला. शौर्य याच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. शौर्य याने हा वार चुकवुन तो पळु लागला. त्याचे मित्रही आरडाओरडा करत पळू लागले. पळत असताना शौर्य हा खाली पडला. तेव्हा त्या ६ जणांनी त्यांच्याकडील कोयता व धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यावर मारु लागले. त्याने हात आडवा घातला असता पोटरीवर व हाताचे बोटावर वार झाल्याने गंभीर दुखापत झाली. त्याच्या डोक्याचे मागील बाजूस व मध्यभागी कोयत्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. लोक जमा झाल्याने ते पळून गेले.

या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ६ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक रणजितसिंग परदेशी तपास करीत आहेत.

 

Vedh News