पुणेकरांची प्रतीक्षा संपली ! आजपासून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो धावण्यास सुरुवात तिकीट, वेळापत्रक जाणून घ्या

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल, मंगळवारी (दि. ३) ऑनलाईन पद्धतीने पुण्यातील बहुप्रतिक्षीत हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन झाले. आज बुधवार (दि. ४ ) पासून सकाळी ६ वाजल्यापासून प्रवाशांसाठी नियमित मेट्रो धावण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात माण-हिंजवडी ते शिवाजीनगर ‘पुणेरी मेट्रो’ (पिंक लाईन) प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे.
मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोसेवेचे उद्घाटन करण्यात आले. बालेवाडी क्रीडा संकुलात झालेल्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, खासदार आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटलांसह अन्य आमदार, खासदार नेते पुण्यात उपस्थित होते.
जिल्हा न्यायालयापासून ते हिंजवडी फेज ३ म्हणजेच मेगापोलिस सर्कलपर्यंत जायला आता फक्त ६२ रुपये लागणार आहेत. स्टेशनवरच्या खिडकीवर तर तिकीट मिळेलच, पण त्यासोबतच QR कोडने पण तिकीट काढता येईल. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आता व्हॉट्सअँपवर पण मेट्रोचे तिकीट मिळणार आहे. त्यामुळे रांगेत उभे राहण्याची गरज नाही. सकाळी ऑफिसच्या गर्दीच्या वेळेत म्हणजे सकाळी ७.३० ते ९.३० आणि संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत दर ६ मिनिटाला मेट्रो मिळणार आहे. बाकीच्या वेळेत गर्दी कमी असते, तेव्हा दर १२ मिनिटाला मेट्रो धावेल. या नवीन मार्गाला पिंक लाईन किंवा पुणेरी मेट्रो म्हणून ओळखले जाणार आहे. या मार्गासाठी एकूण २२ ट्रेन तयार आहेत. सकाळी ६ वाजता पहिली मेट्रो निघेल आणि रात्री ११.४० वाजता जिल्हा न्यायालयातून हिंजवडीकडे जाणारी शेवटची मेट्रो असेल.
सध्या पहिल्या टप्प्यात ही मेट्रो १७ स्थानकांवर थांबणार आहे. उर्वरित ६ स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात असून ती नंतर टप्प्याटप्प्याने सुरू केली जातील. माण, माण–एमआयडीसी सर्कल, माण बस डेपो, हिंजवडी फेज २ सर्कल २, हिंजवडी फेज २ सर्कल १, पद्मभूषण चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक (शिवाजी चौक), हिंजवडी फेज, वाकड चौक, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल (म्हाळुंगे/बालेवाडी स्टेडियम), मिटकॉन बालेवाडी, आणि आर. के. लक्ष्मण म्युझियम बालेवाडी, औंध, सकाळ नगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कृषी महाविद्यालय आणि जिल्हा न्यायालय या स्थानकावर मेट्रो थांबणार आहे. बालेवाडी हाय स्ट्रीट, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर पाषाण लिंक रोड, भोसले नगर आणि शिवाजीनगर या सहा स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात असून ही स्थानके लवकरच प्रवाशांसाठी खुली केली जाणार आहेत.






