पुण्यात FDA ची कारवाई! कोंढव्यात ११९० किलो लाडू जप्त तर धानोर येथे ३०३ किलो बर्फीचा साठा जागेवरच नष्ट

पुण्यात FDA ची कारवाई! कोंढव्यात ११९० किलो लाडू जप्त तर धानोर येथे ३०३ किलो बर्फीचा साठा जागेवरच नष्ट
Share

पुणे – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने मिठाई उत्पादकांच्या आस्थापनावर धडाकेबाज कारवाई सुरु केली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील गायत्री लाडू भांडारच्या उत्पादन केंद्रावर छापा टाकून FDA ने तब्बल ११९० किलो लाडू आणि इतर खाद्यपदार्थ जप्त केले आहेत. दुसऱ्या कारवाईत ३०३ किलो बर्फीचा साठा जागेवरच नष्ट करण्यात आला.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी बालाजी शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासणीदरम्यान लाडू आणि बुंदीमध्ये निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक खाद्यरंगाचा वापर केल्याचे आढळले. तसेच उत्पादन केंद्रात स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत नसल्याचेही निदर्शनास आले.

याप्रकरणी लाडू आणि बुंदीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. बालाजी शिंदे म्हणाले, “उत्पादन केंद्रात अतिरिक्त खाद्यरंगाचा वापर आणि अस्वच्छता आढळली आहे. एकूण ११९० किलो खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले असून, त्यांची किंमत अंदाजे १ लाख ७३ हजार ९५० रुपये आहे. नमुने तपासणीसाठी पाठवले असून पुढील कारवाई सुरू आहे.” अशी माहिती बालाजी शिंदे यांनी दिली.

३०३ किलो बर्फीचा साठा जागेवरच नष्ट

२ नोव्हेंबर २०२६ रोजी खेड तालुक्यातील धानोर येथील मे. आर. बिकानेर मिठाई या दुकानाची अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने तपासणी केली असता तपासणीदरम्यान दुकानात बर्फी आणि कलाकंद या मिठाईचा निकृष्ट दर्जाचा साठा आढळून आला. विशेष म्हणजे, ही बर्फी खोलीच्या तापमानावर साठवून ठेवण्यात आली होती. तसेच मिठाईवर आवश्यक लेबलिंग करण्यात आले नव्हते. या मालाच्या खरेदीची बिलेही दुकानचालकाकडे उपलब्ध नव्हती.

बर्फी हा नाशवंत अन्नपदार्थ असल्याने नागरिकांच्या आरोग्याला संभाव्य धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने ३०३ किलो बर्फीचा साठा जागेवरच नष्ट केला. याशिवाय कलाकंदाचा सुटा नमुना तपासणी आणि विश्लेषणासाठी घेण्यात आला आहे. या नमुन्याच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

Vedh News