पुणे- एमपीएससी पेपरफुटीच्या निषेधार्थ पुण्यात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या या धडक मोर्चात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे देखील सहभागी झाले होते. संतापलेल्या विद्यार्थ्यांनी हातात पोस्टर्स घेऊन या आंदोलनात मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात स्पर्धा परीक्षार्थ्यांचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. ओंकारेश्वर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर मोर्चा काढण्यात आला आहे. हजारो स्पर्धा परीक्षार्थी सरकारवर टीका करणारे फलक घेऊन मोर्चात सहभागी झाले आहेत. या गैरप्रकाराच्या अनुषंगाने एमपीएससी अध्यक्ष, सचिवांनी राजीनामा द्यावा यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी MPSC चे अध्यक्ष आणि सचिव यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करावी, गट-ब परीक्षेबाबत विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपांवर आठ दिवसांच्या आत स्पष्ट भूमिका मांडावी, तसेच गैरप्रकारांची चौकशी करावी, याशिवाय मुंबई क्राईम ब्रँचकडून MPSC ला देण्यात आलेला प्राथमिक चौकशी अहवाल सार्वजनिक करावा, केवळ एका परीक्षेपुरती चौकशी मर्यादित न ठेवता, इतर परीक्षांच्या निकालांबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचीही दखल घ्यावी, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
