सावधान ! विनापरवाना फटाके स्टॉल सुरु केल्यास कारवाई ; पिंपरी चिंचवड महापालिकेचा इशारा

सावधान ! विनापरवाना फटाके स्टॉल सुरु केल्यास कारवाई ; पिंपरी चिंचवड महापालिकेचा इशारा
Share

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाने विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्या आणि बेकायदा स्टॉल उभारणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. आत्तापर्यंत फटाके विक्रीसाठी २३ अर्ज दाखल झाले असून फक्त एका स्टॉलला परवानगी देण्यात आली आहे.

५ नोव्हेंबर पासून दिवाळी सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दहा क्षेत्रीय कार्यालयांना अग्निशमन विभागाने फटका दुकानाच्या विक्रीबाबतच्या नियमांचे पत्र पाठवले आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील फटका विक्री दुकानांची पाहणी करावी असे आदेश देण्यात आलेले आहेत. विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्या आणि बेकायदा स्टॉल उभारणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

फटाका स्टॉल किंवा दुकान सुरू करण्यापूर्वी महापालिकेच्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. महापालिकेकडून जागेनुसार साधारण २,००० ते २,५०० रुपये तात्पुरता परवाना शुल्क आकारण्यात येणार आहे. स्टॉल फक्त पक्क्या स्वरूपाच्या (RCC) इमारतींमध्ये किंवा शटर असलेल्या दुकानांमध्येच लावता येतील. खुल्या मैदानावर किंवा गजबजलेल्या लोकवस्तीत स्टॉल लावण्यास परवानगी देण्यात येणार नाही. तसेच स्टॉल जवळ अग्निशामक यंत्रे आणि पाण्याचा साठा ठेवणे सक्तीचे करण्यात आले आहे.

आगीच्या घटना टाळण्यासाठी दुकानाशेजारी वाळूचा साठा ठेवावा. परिसरात बिडी, सिगारेट पेटवू नये, लहान मुलांना स्टॉल पासून दूर ठेवावे. विनापरवाना किंवा अनधिकृत ठिकाणी स्टॉल उभारल्यास महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत जप्ती व दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी दिला आहे.

चालू वर्षी फटाका विक्रीच्या परवानगीसाठी आतापर्यंत २३ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी केवळ एका अर्जाला मंजुरी देण्यात आली आहे.

Vedh News