अल्पवयीन मुलीचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या नराधमाला २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या नराधमाला २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा
Share

पुणे – लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नराधमाला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी यांनी २० वर्षे सक्तमजुरी आणि १ लाख २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यामध्ये पीडित मुलगी, तिची आई आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष तसेच न्यायालयात सादर करण्यात आलेले महत्त्वाचे पुरावे निर्णायक ठरले.

महंमद साकिब शफी अहमद शेख (वय ३२, रा. नागपाडा, मुंबई) असे या आरोपीचे नाव आहे. हा प्रकार २०२० मध्ये घडला होता.

महंमद शेख याने एका अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून मुंबईला नेले. मुंबईत आरोपीने नागपाडा आणि आसपासच्या विविध भागांमध्ये वेळोवेळी भाड्याने खोल्या घेतल्या. मुलीला तेथे ठेवून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर वारंवार अत्याचार केले. मुलगी अचानक गायब झाल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तातडीने पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्याने तपास करत आरोपीला अटक करून पीडित मुलीची सुटका केली. तपासादरम्यान आरोपीने मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याच्या घरात ठेवून तिच्यावर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपी महंमद साकिब शेख याच्या विरोधात सर्व आवश्यक पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

न्यायालयात सुनावणी सुरू झाल्यानंतर विशेष सरकारी वकील लीना पाठक यांनी सरकार पक्षातर्फे मजबूत आणि प्रभावी बाजू मांडली. या गंभीर खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणी दरम्यान पीडित मुलीची झालेली साक्ष, तिची आई, वैद्यकीय तपासणी करणारे अधिकारी आणि पोलीस यंत्रणेची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. सरकारी वकील लीना पाठक यांनी पीडितेचा अधिकृत जन्मदाखला न्यायालयात सादर करून ती गुन्ह्याच्या वेळी अल्पवयीन असल्याचे सिद्ध केले. याशिवाय वैद्यकीय अहवाल आणि इतर फॉरेन्सिक पुरावे न्यायालयासमोर मांडण्यात आले. आरोपीने जाणीवपूर्वक आणि क्रूरतेने हे कृत्य केले असून त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी सरकारी पक्षाने न्यायालयात लावून धरली.

बचाव पक्ष आणि सरकारी पक्ष या दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी यांनी आरोपी महंमद साकिब शफी अहमद शेख याला दोषी ठरवले. समाजात अशा गुन्ह्यांना थारा मिळू नये आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा संदेश जावा यासाठी न्यायालयाने आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी आणि १ लाख २५ हजार रुपये दंड अशी कठोर शिक्षा सुनावली. दंडाची संपूर्ण रक्कम पीडित मुलीला नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले. यासोबतच, राज्य सरकारच्या ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत पीडित मुलीला अतिरिक्त आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई मिळवून देण्याचे निर्देशही न्यायालयाने संबंधित प्राधिकरणाला दिले आहेत.

Vedh News