मावळ गोळीबारातील १३ जखमींना पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरी देण्याचा फेरप्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या आंदोलनात झालेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना महापालिकेने यापूर्वीच कायमस्वरूपी नोकरी दिली आहे. मात्र गोळीबारात जखमी झालेल्या १३ जणांना नोकरी देण्याचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. हा प्रस्ताव आता मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार राज्य शासनाकडे फेरविचारार्थ पाठवण्यात आला आहे.
पवना बंद जलवाहिनीच्या विरोधात ९ ऑगस्ट २०११ रोजी स्थानिक शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या दरम्यान झालेल्या गोळीबारात मोरेश्वर साठे, कांताबाई ठाकर व शामराव तुपे या तीन शेतकर्यांचा मृत्यू झाला. तर, योगेश तुपे, शिवाजी बर्वे, अमित दळवी, विशाल राऊत, अजित चौधरी, नवनाथ गराडे, गणेश तरस, तुकाराम दळवी, मारूती खिरीड, काळूराम राऊत, दत्तात्रय पवार, सुरेखा कुडे आणि निलेश खुडे हे शेतकरी जखमी झाले होते.

मावळ गोळीबारातील जखमींसह शेतकरी संघटनांनी वेळोवेळी महापालिकेकडे नोकरी मिळावी, अशी मागणी केलेली आहे. घटनेनंतर जखमींनाही महापालिकेत नोकरी देण्याचे आश्वासन दिले गेले होते. परंतु, अनेक वर्षे उलटूनही जखमींना नोकरी दिलेली नाही. जखमींच्या वारसांना नोकरी देण्यात यावी अशी मागणी कायम होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जखमींना नोकरी देण्याचा फेरप्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठवला आहे. शासनाने मान्यता दिल्यानंतर त्यांना महापालिकेत नोकरी दिली जाणार आहे.
पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाची सद्यस्थिती
पवना धरण ते निगडीमधील सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ३४.७१ किलोमीटर अंतराची समांतर जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यापैकी ४.४० किलोमीटर अंतराचे शहरातील काम झाले आहे. हद्दीबाहेरील उर्वरित ३०.३१ किलोमीटर अंतराची जलवाहिनी टाकणे बाकी आहे. ती सर्व जागा ताब्यात आली आहे मात्र उर्सेमधील ३.४३ किलोमीटरची जागा ताब्यात आलेली नाही. धरणाजवळ अशुद्ध जलउपसा केंद्र उभारण्यात येणार आहे. धरणातून ६१० दशलक्ष लिटर पाणी उचलून जॅकवेल द्वारे जलवाहिनीच्या सोडले जाईल. ते पाणी थेट जलशुद्धीकरण केंद्रावर आणून त्यावर प्रक्रिया करून ते पिंपरी-चिंचवड शहराला पुरवण्यात येणार आहे.