ब्रेकिंग न्यूज

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन, कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास

Share

कोल्हापूर- ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (ज्ञानदेव यशवंतराव पाटील) यांचे वयाच्या ९० व्या वर्षी कोल्हापुरात वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ९० व्या वर्षी कोल्हापुरात वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक मोठा दीपस्तंभ हरपला आहे.

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण आणि सार्वजनिक जीवनात मोठी मजल मारली. समाजसेवा, शिक्षणाचा प्रसार आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या शैक्षणिक संस्था आज देश-विदेशात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ या प्रतिष्ठेच्या नागरी सन्मानाने गौरविले होते.

डॉ. डी. वाय. पाटील यांचा जन्म २ ऑक्टोबर १९३५ रोजी अंबाप, जिल्हा कोल्हापूर येथे झाला. त्यांनी ‘डी. वाय. पाटील ग्रुप’ची स्थापना करून देशभरात १८२ हून अधिक शैक्षणिक संस्था, आंतरराष्ट्रीय शाळा आणि सात विद्यापीठांचे अथांग साम्राज्य उभे केले.राजकीय कारकीर्द: ते महाराष्ट्रात आमदार आणि मंत्री राहिले होते. त्यानंतर त्यांनी बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणूनही यशस्वी जबाबदारी सांभाळली.

ते काँग्रेसचे दिग्गज नेते सतेज (बंटी) पाटील यांचे वडील होते.त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.