ब्रेकिंग न्यूज

स्मशानात मृतदेह ठेवला आणि सगळे ग्रामस्थ पळाले… आंबेगाव तालुक्यात अचानक काय घडलं?

Share

पुणे- जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या सरहद्दीवरील वडगाव पीर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारादरम्यान धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. अंत्यसंस्कारासारख्या अत्यंत शोकाकूल प्रसंगी अचानक ग्रामस्थांनी मृतदेह खाली सोडून पळ काढला. अत्यंत संवेदनशील वेळी नेमकं काय घडलं? याची जोरदार चर्चा पंचक्रोशीत होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव पीर येथील स्थानिक स्मशानभूमीत एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं जमले होते. अंत्यसंस्काराचे विधी सुरू असतानाच स्मशानभूमी परिसरातील मधमाशांचे मोहोळ अचानक उठले आणि उपस्थित ग्रामस्थांवर हल्ला केला. अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यामुळे प्रत्येकजण सैरावैरा धावत सुटला. हा हल्ला इतका अनपेक्षित आणि भीषण होता की, अवघ्या काही सेकंदांतच तिथे एकच हाहाकार उडाला. स्मशानभूमीत भीतीचं वातावरण निर्माण झालं. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाही.

स्वतःचा बचाव करताना अनेक नागरिकांना मधमाशांनी कडाडून चावा घेतल्यानं ते जखमी झाले. या जखमींना तातडीनं जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतर सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. काहीवेळाने स्मशानभूमी परिसरातील मधमाशांचा प्रादुर्भाव थोडा निवळल्यानंतर, काही ग्रामस्थांनी पुन्हा एकत्र येत राहिलेले अंत्यसंस्कार पूर्ण केले. स्मशानभूमी परिसरातील मधमाशांच्या मोहोळाबाबत योग्य उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.