पुणे- ‘गणेशोत्सव आणि इतर सणांमध्ये कर्णकर्कश डीजे वाजवण्यास परवानगी देण्यात येणार असेल, तर या उत्सवांच्या कालावधीत राज्य सरकारने पगारी सुट्टी जाहीर करावी. तसेच, शहरात राहणाऱ्या सर्व नागरिकांच्या राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय शहर सोडून इतरत्र करावी. अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मात्र हा खर्च नागरिकांच्या करातून नाही, तर मंडळांकडून वसूल करण्यात यावा. असेही या मागणीत म्हटले आहे. या अटी मान्य असतील तरच डीजे वाजवण्यास परवानगी द्यावी असे म्हटले आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने विजय सागर, विलास लेले, सूर्यकांत पाठक, वीणा दिवाण, रवींद्र वाटवे, प्रशांत कुलकर्णी, प्रकाश राजगुरू, विजया वाघ, अंजली देशमुख, माधुरी गानू, राजश्री दिवाण, सुनील नाईक, अशोक भोर, शिवाजी फरांदे, रवींद्र सिन्हा, पुष्कर कुलकर्णी, किशोरी रावल आदींनी ही मागणी केली आहे.
सध्या पुण्यात डीजे आणि ढोल ताशा वादनावर जोरदार वाद प्रतिवाद पाहायला मिळत आहे. विद्यानंद बापट आणि शरद केळकर या पुणेकरांनी डीजेच्या विरोधात आवाज उठवला आहे. पुणेकरांनी देखील कोणत्याही परिस्थितीत डीजे नको अशी ठाम भूमिका घेतली आहे.
‘गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस, प्रशासनाने आयोजित केलेल्या बैठकीत पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे आणि भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासमोर ‘डीजे’विरोधात आक्षेप घेणाऱ्या विद्यानंद बापट यांना सभागृहाबाहेर काढण्यात आले. तसेच, ज्यांना त्रास होतो, त्यांनी पुण्याबाहेर जावे. त्यांचा खर्च आम्ही देऊ, असे गणेशमंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याच बैठकीत कोणत्याही बंधनाशिवाय उत्सव साजरा होईल, अशी भूमिका महापौर आणि भाजपच्या शहराध्यक्षांनी घेतली.
या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात ‘डीजे’चा आवाज सुरूच राहणार असेल, तर सरकारने त्या-त्या दिवशी पगारी सुटी जाहीर करावी. त्यात राज्यातील सर्व कंपन्या, सरकारी कार्यालये, निम-सरकारी कार्यालये, बँका, खासगी कार्यालये, दुकाने, शाळा आणि महाविद्यालयांचाही समावेश करण्यात यावा. तसेच, शहरात राहणाऱ्या सर्व नागरिकांच्या राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय शहर सोडून इतरत्र करावी. हा सर्व खर्च नागरिकांच्या करातून नाही, तर मंडळांकडून वसूल करण्यात यावा. या अटींवरच ‘डीजे’ वाजवायला परवानगी द्यावी. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांबरोबरच वयस्कर नागरिकही खूश होतील. आपले राजकीय अस्तित्व अबाधित राहील,’ अशी भूमिका अखिल भारतीय ग्राहक मंचाने आपल्या पत्रात मांडली आहे.
दरम्यान, ‘कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी आवाजाला ५० डेसिबलची मर्यादा आहे. मात्र, पुण्यासह मोठ्या शहरांमध्ये विविध उत्सव, जयंती आणि मिरवणुकांमध्ये १०० डेसिबलपेक्षा जास्त आवाज होतो. त्या बाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे,’ असेही ग्राहक पंचायतीकडून कळविण्यात आले आहे.
