ब्रेकिंग न्यूज

“गाेंधळ घातल्यास थेट निलंबित केले जाईल” पिंपरीच्या महापौरांचा भाजप नगरसेवकांना इशारा

Share

पिंपरी- ‘भाजप एक कुटुंब असून सर्वांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. सभागृहात बाेलायची संधी देताे. त्यानंतरही मध्येच काेणी उठतो, बाेलतो, सहा महिने हे पाहतोय, आता माझी सहनशिलता संपली आहे. मी आता काेणाचेच ऐकणार नाही. गाेंधळ घातल्यास थेट निलंबित केले जाईल,’असा इशारा महापाैर रवी लांडगे यांनी भाजप नगरसेवकांना दिला. पिंपरी-चिंचवड महापालिकेची ऑगस्ट महिन्याची सर्वसाधारण सभा तहकूब करावी लागल्यानंतर सप्टेंबर महिन्याची सभा बुधवारी आयाेजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवकांची मंगळवारी महापालिकेत बैठक झाली. या बैठकीत महापाैरांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सर्व नगरसेवकांमध्ये शांतता पसरली.

सभागृहात वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप, आक्षेपार्ह भाषा, घोषणाबाजी, गोंधळ, महापौरांच्या आदेशाचे उल्लंघन, सभागृहाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचेल असे वर्तन खपवून घेतले जाणार नाही. सभागृहातील शिस्तीचे उल्लंघन झाल्यास नगरसेवकाविरुद्ध कारवाईचाही इशारा देण्यात आला. ‘प्रत्येकाने सभागृहाची प्रतिष्ठा राखावी. कोणत्याही विषयावर बोलण्यासाठी सदस्यांनी हातवर करून परवानगी घ्यावी. बोलण्याची संधी मिळाल्यानंतरच मत मांडावे. एकाच वेळी अनेकांनी बोलणे, जागेवरून विनापरवानगी बोलणे, इतरांच्या भाषणात अडथळा आणणे अथवा सभेच्या कामकाजात व्यत्यय निर्माण करणे टाळावे. चर्चेदरम्यान संबंधित विषयापुरतेच बोलावे आणि विषयाशी संबंध नसलेले अवांतर वक्तव्य टाळावे,’ अशा सूचना महापौर लांडगे यांनी नगरसेवकांना दिल्या.

‘विषयांवर उपसूचना मांडावयाची असल्यास ती सभेच्या एक दिवस अगोदर लेखी स्वरूपात सादर करावी. त्यामुळे संबंधित उपसूचना मूळ प्रस्तावाशी सुसंगत आहे का, याबाबत प्रशासकीय बाबी तपासून सभागृहापुढे मांडता येतील. ऐनवेळी सादर करण्यात येणाऱ्या उपसूचना स्वीकारल्या जाणार नाहीत,’ असेही बैठकीमध्ये स्पष्ट करण्यात आले. सभागृहात वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप, आक्षेपार्ह भाषा, घोषणाबाजी, गोंधळ, महापौरांच्या आदेशाचे उल्लंघन, सभागृहाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचेल असे वर्तन खपवून घेतले जाणार नाही. सभागृहातील शिस्तीचे उल्लंघन झाल्यास नगरसेवकाविरुद्ध कारवाईचाही इशारा महापौरांनी दिला.