पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या एका नगरसेविकेने केलेले वादग्रस्त वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे. ‘मी त्या ठेकेदाराला विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार’, असे धक्कादायक विधान पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे यांनी केले आहे. बुधवारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोरे यांनी हे वक्तव्य केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक स्मशानभूमींमधील विद्युत दाहिनी नादुरुस्त असल्याचा मुद्दा शैलजा मोरे यांनी बुधवारी सभागृहातील सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. या दाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी पालिका आयुक्त आणि संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. संतप्त झालेल्या शैलजा मोरे यांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरले.
यापुढे या विषयावर सर्वसाधारण सभेत चर्चा होणार नाही. प्रशासनाने संबंधित ठेकेदारांची नावे जाहीर करावीत, अशी मागणी शैलजा मोरे यांनी केली. “त्यानंतरही ठेकेदारांनी सुधारणा केली नाही तर मी त्या ठेकेदाराला विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार”, असे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले.
लोकप्रतिनीधीच गुन्हेगारांसारखी कायदा हातात घेण्याची धमकी देऊ लागले तर कसे होणार, असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जात आहे.
