ब्रेकिंग न्यूज

कुस्तीपटू महिलेची तीन चिमुकल्यांसह आत्महत्या, नळदुर्ग किल्ल्यावरुन घेतली उडी

Share

धाराशिव – नळदुर्ग येथील भुईकोट किल्ल्यातील उपल्या बुरुजावरून आईने आपल्या तीन मुलांसह उडी मारली. ही घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत आई आणि एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. तर दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. 

अश्विनी मनोहर पौळ (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून अजिंक्य मनोहर पौळ (वय ५) या घटनेत मृत्यूमुखी पडला आहे. अश्विनी यांच्या दोन मुली वीरा मनोहर पौळ आणि क्रांती मनोहर पौळ या गंभीर जखमी झाल्या आहेत. दोन्ही मुलींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात हलविले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.

अश्विनी या उमरगा तालुक्यातील व्हांताळ येथील रहिवासी होत्या. शालेय जीवनापासून कुस्ती स्पर्धेत अव्वल क्रीडापटू म्हणून परिसरात ओळखल्या जात होत्या. अश्विनी पौळ मुंबईत ‘एमएसएफ’मध्ये नोकरी करत होत्या. त्यांचे पती मनोहर रिक्षा चालक असून त्यांच्या सांगण्यावरून अश्विनी यांनी चार ते पाच महिन्यांपूर्वी नोकरीचा राजीनामा दिला होता.

घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतक आणि जखमी मुलींना तात्काळ शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.