ब्रेकिंग न्यूज

आर्ट्स स्टुडिओच्या कला कार्यशाळेत चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक 

Share

पुणे – धायरी परिसरातील मुठा कालव्याशेजारी असलेल्या पिनाक आर्ट्स स्टुडिओच्या कला कार्यशाळेत धातूचे साहित्य तसेच मोटारसायकल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला नांदेडसिटी पोलिसांनी अटक केली.

आकाश बाळू ननावरे (वय ३२, रा. दत्तवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

या गुन्ह्याच्या तपासासाठी नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी स्वतंत्र तपास पथक नेमले होते. या पथकातील पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत, पोलिस अंमलदार निलेश कुलथे व शुभम उर्फ बंटी चव्हाण हे घटनास्थळी पाहणी करत असताना आरोपी आकाश ननावरे हा रात्रीच्या वेळी संशयास्पदरीत्या फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी त्याचा शोध घेत दत्तवाडी परिसरातून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून चोरीस गेलेले धातूचे साहित्य तसेच विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील चोरीची दुचाकी मोटारसायकल असा एकूण ४ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीकडून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही कारवाई नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राजत, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत तसेच पोलिस अंमलदार निलेश कुलथे, शुभम चव्हाण, राजू बेगरे, प्रतीक भोरे, स्वप्निल मगर, मनोहर खराडे, सतीश खोत, निलेश बांधे, मोहन मिरगाळ, शिवाजी क्षीरसागर, संग्राम शिनगारे, भिमराज गांगुर्डे, उत्तम शिंदे, निलेश तनपुरे, अक्षय जाधव यांच्या पथकाने केली.