ब्रेकिंग न्यूज

तरुणाच्या अपहरणाचा कट उधळला ; समृद्धी महामार्गावर पोलिसांनी पाठलाग करून आरोपीना केली अटक

Share

पुणे- पुणे येथे राहणाऱ्या तरुणाचे अपहरण करून त्याला थेट उत्तर प्रदेशात पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार समृद्धी महामार्गावर उघडकीस आला. चित्रपटात शोभेल असा तीन किमीपर्यंत पाठलाग करून महामार्ग पोलिसांनी मोटार अडवून आरोपीना ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास करण्यात आली.

आरशद शकील अहमद सिद्दीकी (वय २४ वर्ष, रा. मोरे वजन काटयाजवळ मोरे पाटील चौक, चिखली, पुणे) असे अपहरण केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी महमद अन्वर सिद्दीकी (वय ३९), निजामुद्दीन सिद्दीकी (वय ४१), फाजील हुसेन सिद्दीकी (वय २३), महंमद साहील सिद्दीकी (वय २१), महंमद सिद्दीकी इमामुद्दीन सिद्दीकी आणि सायमा खातून सिद्दीकी (वय २६, महिला सर्व रा. उत्तर प्रदेश) यांना ताब्यात घेण्यात आले. पकडलेल्या आरोपींना कोपरगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, पिंपरी चिंचवड येथिल चिखली परिसरातून आरशद शकील अहमद सिद्दीकी या तरुणाचे बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आरोपींनी अपहरण करून उत्तर प्रदेश येथे घेऊन चालल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून समृद्धी मार्ग नियंत्रण कक्षाला मिळाली. संशयित आरोपी अर्टिगा मोटारीतून (युपी ९० एई ९३७५) पीडित तरुणाला घेऊन समृद्धी महामार्गाने सिन्नरकडून नागपूरच्या दिशेने पळ काढत आहेत, ही माहिती मिळताच बाभळेश्वरच्या महामार्ग पोलिसांनी समृद्धी महामार्गावर शोधमोहीम सुरू केली. चॅनल क्र. ५२३ जवळ पोलिसांना संशयित अर्टिगा मोटार भरधाव वेगाने जाताना दिसली.​ पोलिसांनी मोटारीचा पाठलाग सुरू केला. सलग ३ किमीच्या पाठलागानंतर चॅनल क्र. ५२० जवळ पोलिसांनी मोटारीला घेरले आणि थांबवले.

मोटारीतील सहा संशयित आरोपीना ताब्यात घेण्यात आले. तसेच गुन्ह्यात वापरलेली कार कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली. पुढील तपास पिंपरी-चिंचवड पोलीस करत आहेत. ही कारवाई बाभळेश्वर महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब ठोंबरे, पोलीस नाईक महेश बोरुडे, रामचंद्र साळुंके, पोलीस प्रवीण पालवे, रोहित आरवडे आणि शिंदे यांच्या पथकाने केली.