ब्रेकिंग न्यूज

बिचारी रस्त्याच्या कडेला उभी होती, मृत्यू तिच्या दिशेने आला, निगडी येथे ५ वर्षाच्या मुलीचा टेम्पो खाली सापडून जागीच मृत्यू 

Share

पिंपरी- शहरात एकीकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु असतानाच निगडी परिसरात आज, सोमवारी दुपारी एका दुर्दैवी घटनेत ५ वर्षाच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. निगडीच्या साईनाथ नगर भागात दुपारी सव्वा बाराच्या सुमारास हा अपघात झाला. 

संस्कृती भागवत बिरादार (वय ५ वर्षे, रा. यमुनानगर, निगडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे.

अपघाताची माहिती अशी की, निगडीच्या साईनाथ नगर परिसरात कचरा संकलनासाठी आलेल्या BVG कंपनीच्या एका चार चाकी टेम्पोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्याचं वेळी दुचाकीजवळ उभी असलेली संस्कृती या धक्क्यामुळे टेम्पोच्या खाली आली आणि टेम्पोचे चाक तिच्या अंगावरून गेले. हा अपघात आज सोमवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडला.

गंभीर जखमी झालेल्या संस्कृतीला तातडीने निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या प्रकरणी निगडी पोलिसांनी टेम्पो चालक राहुल प्रल्हाद चव्हाण (वय २८, रा. चिखली) आणि त्याचा साथीदार राजू कुमार गायकवाड (वय ३८, रा. ओटास्कीम, निगडी) यांना वाहनासह ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या आनंदाच्या वातावरणात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे निगडी परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.