अनैतिक संबंधाचा जाब विचारल्याने मारहाण केल्यामुळे गर्भवती महिलेची आत्महत्या ; लष्करातील जवानाविरुद्ध गुन्हा

पुणे – अनैतिक संबंधाचा जाब विचारल्याने विवाहितेला मारहाण करुन छळ करण्यात आला. तसेच लग्नाच्या वेळी बुलेट दिलेली असताना आता बुलेरो गाडीची मागणी करुन शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने गर्भवती विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. खडकी पोलिसांनी आर्मी हॉस्पिटलमधील जवानावर गुन्हा दाखल केला आहे.
काजल सुंदर सौरोट (वय २३) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचा पती सुंदर सौरोट (वय २७, रा. पर्सनल लाईन, मिलिटरी हॉस्पिटल, रेंजहिल्स, खडकी, मुळ रा. घरिहीपट्टी, ता. होडल, जि. पलवल, हरियाना) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत काजल हिचे वडील चंदरभान भीमसिंग शेहरावत (वय ५४, रा. हरियाना) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काजल हिचा विवाह सुंदर सौरोट याच्याबरोबर ९ डिसेंबर २०२३ रोजी झाला होता. सुंदर सौरोट हा आर्मीचे एम एच हॉस्पिटल खडकी येथे शिपाई (नर्सिंग असिस्टंट) म्हणून कामाला आहे. सुंदर सुरुवातीला जम्मू काश्मिर व त्यानंतर पुण्यामध्ये पोस्टिंग कर्तव्यावर आहे. लग्नाच्या वेळी सुंदर याने बुलेट गाडीची मागणी केली होती. त्याप्रमाणे त्याला बुलेट दिली होती.
लग्नानंतर सुंदर याचे अनैतिक संबंध असल्याचे समजले होते. तिने जाब विचारल्यानंतर त्याने काजलला मारहाण केली होती. हे समजल्यावर तिचे वडिल काजलला हरियाना येथील घरी घेऊन आले होते. त्यांच्या नातेवाईकांनी मध्यस्थी केल्यानंतर त्याने अशा प्रकारचे कृत्य पुन्हा होणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर ही त्याचे अनैतिक संबंध चालू असल्याचे काजल हिच्या लक्षात आले. त्यावरून त्यांच्यात वाद होऊ लागले. जुलै २०२६ मध्ये फिर्यादी हे टाटा टियागो गाडी घेत असल्याचे सुंदर याला समजल्यावर त्याने काजल हिच्याकडे त्याचे स्वत: करीता एक बुलेरो गाडी तुझ्या वडिलांकडून घेऊन ये, अशी मागणी केली. त्यावरुन तो तिला वारंवार मानसिक व शारीरीक त्रास देऊन मारहाण व शिवीगाळ करत होता.
१ ऑगस्ट २०२६ रोजी ती फिर्यादी यांना भेटायला आली होती. त्यावेळी तिने आपल्या आईला ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे सांगितले होते. त्यावेळी सुंदर याने काजल हिला १५ दिवसांकरिता त्याच्याकडे पुणे येथे राहण्यासाठी बोलाविले. काजल पुण्यात आल्यावर तिला सुंदर याचे अनैतिक संबंध सुरु असल्याबाबत त्याचे मोबाईलमध्ये चॅटींग सापडल्याने काजलने त्याला विचारणा केली. त्यावर सुदंर काजलला म्हणाला, ‘‘माझ्या जीवनात तू नको आहेस, तू माझ्या जीवनात नसली तरी मला काही एक फरक पडत नाही. तू मला जे हवे आहे, त्यातले काहीच देऊ शकत नाही़’’ असे म्हणून त्याने काजलला शिवीगाळ करुन मारहाण केली. या घटनेनंतर २१ ऑगस्ट रोजी काजल हिने पुण्यातील घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक खापे तपास करीत आहेत.






